इंडिया आघाडीत पंतप्रधानाचे उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे; ममता बॅनर्जींनी मांडला प्रस्ताव; 28 पैकी किती पक्षांचा पाठिंबा ?

काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली देशातील २८ विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचा बैठक देशाची राजधानी दिल्ली येथे काल मंगळवारी पार पडली. सुमारे ३ तासांहून अधिक काळ चाललेल्या आघाडीच्या या चौथ्या बैठकीतदेखील आगामी लोकसभा निवडणुकीसाठीचे जागावाटप आणि आघाडीचे नेतृत्व कोण करणार, या मुद्द्यावर उत्तर सापडलेले नाही.

इंडिया आघाडीतर्फे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असावे, असा प्रस्ताव तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मांडला. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान दिल्लीत बुधवारी बॅनर्जी यांनी सेंट्रल फंड्सच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींची भेट घेतली, यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी खरगे यांचं नाव का पुढे केलं याबद्दल खुलासा केला आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, इंडिया आघाडीत पीएम पदाचा उमेदवार कोण आहे याबद्दल सर्वत्र चर्चा सुरू आहे. लोक याबद्दल प्रश्न विचारत आहेत, म्हणून मी मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव पुढे केल्याचं म्हणाल्या. तसेच ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या प्रस्तावाला अरविंद केजरीवाल यांनी देखील समर्थन दिल्याचा दावा केला आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दलित नेता पंतप्रधान पदाचा उमेदवार बनवण्याची मागणी केल्याचे यावेळी स्पष्ट केलं. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, दरवेळी लोक मागणी करत आहेत की, एक फेस पाहिजे. तुमचा चेहरा कोण आहे… म्हणून मी प्रस्ताव ठेवला होता की खरगे यांचं नाव पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून दिलं पाहिजे. ते जर पंतप्रधान पदाचा उमेदवार असतील तर आम्हाला काहीच हरकत नाही. तसेच आम्हाला अरविंद केजरिवाल यांनी पाठिंबा दिला असल्याचे त्या म्हणाल्या.

दरम्यान,  खर्गे पंतप्रधान बनले तर देशाचे पहिली दलित समाजाचे पंतप्रधान होतील, असं वक्तव्य केजरीवाल यांनी बैठकीत केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यानंतर 28 राजकीय पक्षांपैकी 16 राजकीय पक्षांनी खर्गेंच्या नावाला पाठिंबा दिला. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचा देखील समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.