इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बची धमकी

दिल्ली : दिल्लीत बॉम्बच्या धमक्या मिळण्याचा ट्रेंड थांबताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील अनेक मोठ्या शाळांमध्ये बॉम्बच्या धमकीचे ईमेल आले होते. त्याचवेळी, रविवारी (12 मे) दिल्लीतील दोन रुग्णालयांनंतर आता इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला (IGI) बॉम्बची धमकी मिळाली आहे.
सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून विमानतळाचा शोध घेतला जात आहे. यासोबतच दिल्लीतील दोन वेगवेगळ्या रुग्णालयांना धमकीचे ईमेलही पाठवण्यात आले असून त्यात त्यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. पहिले बुरारीचे सरकारी रुग्णालय आणि दुसरे मंगोलपुरीचे संजय गांधी रुग्णालय आहे.

विमानतळ आणि रुग्णालयांना एकाच मेल आयडीवरून आल्या धमक्या

रुग्णालय व्यवस्थापनाने पोलिसांना याची माहिती दिली, त्यानंतर बॉम्बशोधक पथक आणि अग्निशमन दलासह पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. सध्या पोलिसांना काही संशयास्पद आढळले नाही. विशेष बाब म्हणजे विमानतळ आणि रुग्णालयांना धमकीचे ईमेल एकाच मेल आयडीवरून पाठवले जात होते. दुपारी तीनच्या सुमारास हे मेल पाठवण्यात आले. मात्र, विमानतळ आणि रुग्णालयांमध्ये पोलिसांना काहीही संशयास्पद आढळले नाही.