इलेक्ट्रिक शॉक लागल्याने तरुणाचा मृत्यू; जळगावातील घटना

तरुण भारत लाईव्ह । १६ ऑक्टोबर २०२३। जळगाव मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जळगावातील एमआयडीसी येथे एका प्लास्टिक कंपनीत कामाच्या पहिल्याच दिवशी इलेक्ट्रिक शॉक लागून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या तरुणासोबत असलेला दुसरा तरुण सुद्धा गंभीररीत्या भाजला गेला. राहुल राठोड असे मयत तरुणाचे नाव आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, राहुल राठोड हा गेल्या २० वर्षांपासून आई वडील आणि लहान भाऊ यांच्यासोबत जळगावातील फातिमा नगर या ठिकाणी वास्तव्यास आहे. एमआयडीसी येथे एका प्लास्टिक कंपनीत कामाच्या पहिल्याच दिवशी सकाळी आठ वाजेच्या सुमारास काम करताना मशीनचा इलेकट्रोनिक शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या सोबत असलेला जीवन चौधरी हा गंभीररीत्या भाजला गेला.

यावेळी दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी राहुल राठोड याना मृत घोषित केले. तर जखमींवर उपचार सुरु आहेत. राहुल राठोड यांचा कामाच्या पहिल्याच दिवशी असा दुर्देवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.