हमास नेता इस्माईल हानियाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी थेट इस्रायलवर हल्ला करण्याचा आदेश इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी जारी केला आहे. खामेनी यांनी बुधवारी इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या तातडीच्या बैठकीत हा आदेश दिला, असे इराणी अधिका-यांनी सांगितले. यामुळे पश्चिम आशियातील तणाव वाढण्याची तसेच गाझामधील युद्धविरामाच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
बुधवारी सकाळी हमासचा नेता इस्माइल हानिया आणि त्याचा एक अंगरक्षकाची इराणमध्ये हत्या झाली. इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी हनिया तेहरानमध्ये असताना हा हल्ला झाला. या हत्या प्रकरणी हमासने इस्रायलला जबाबदार धरले आहे. मात्र, या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाही. हानियाच्या मृत्यूवर इस्रायलने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, इस्रायलचे हेरिटेज अफेअर्स मंत्री अमिचय एलियाह् यांनी आनंद व्यक्त केला आहे.
हमासचा वरिष्ठ अधिकारी सामी अबू झुहरीने निवेदनात म्हटले की, इस्रायलने केलेली हानियाची हत्या हा हमासवरील गंभीर हल्ला आहे. बुधवारी सकाळी इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत अली खामेनी यांनी म्हटले की, हानियावर इराणमध्ये हल्ला झाला. त्यामुळे आता त्याला प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी इराणचीच आहे.
नेतान्याहू यांनीही दिला चोख प्रत्युत्तराचा इशारा
इराणच्या धमकीवर पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी स्पष्ट केले की, इस्रायल कोणत्याही हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देईल. इस्रायलने गेल्या काही दिवसांत हमास आणि हिजबुल्लासह इराणच्या छुप्या हल्ल्यांना मोठा धक्का दिला आहे. आता आव्हानात्मक दिवस येत आहेत. आम्हाला सर्व बाजूंनी धमक्या ऐकू येत आहेत. आम्ही कोणत्याही परिस्थितीसाठी तयार आहोत आणि आम्ही कोणत्याही धोक्याचा मुकाबला एकजूट आणि दृढनिश्चयाने करू.