इस्रायल – मालदीव वादात भारताचा मोठा फायदा होणार…

गेल्या अनेक दिवसांपासून मालदीव आणि भारत यांच्यात तणावाचे वातावरण आहे. मालदीवमध्ये सत्तेत आलेल्या राष्ट्राध्यक्ष चीनच्या प्रेमात असल्याने ते सतत भारतविरोधी भूमिका घेत आहेत. दुसरीकडे भारताच्या पर्यटकांनी मालदीववर बहिष्कार टाकत त्यांना चांगलाच धडा शिकवला आहे. आता मालदीवने इस्रायली पासपोर्ट असलेल्या लोकांना त्यांच्या देशात येण्यास बंदी घातली आहे. यामुळे इस्रायल संतप्त झाला आहे. इस्रायल आणि मालदीवच्या या वादात मात्र भारताचा फायदा होईल असे दिसत आहे. कारण इस्रायलने आपल्या नागरिकांना आवाहन केले आहे.

भारतीय बेटांना भेट देण्याचा सल्ला

इस्रायलने मालदीववर बहिष्कार टाकून हिंदी महासागरातील भारतीय बेटांना भेट देण्याचा सल्ला दिला आहे. पंतप्रधान मोदी यांनी ज्या बेटांना भेट दिली त्या बेटांना भेट देण्याचं आवाहन त्यांनी आपल्या नागरिकांना केले आहे. भारतातील इस्रायली दूतावासाने हिंदी आणि इंग्रजीमध्ये ट्विट करून हे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले की, अनेक भारतीय किनारे आहेत जे खूप सुंदर आहेत आणि त्यांना अत्यंत आदराने वागणून दिली जाते.

इस्रायली दुतावासाने काय म्हटले

दूतावासाच्या ट्विटर हँडलने ट्विट केले आहे की, “मालदीवने आता इस्रायलींवर बंदी घातली आहे. पण खाली काही सुंदर आणि आश्चर्यकारक भारतीय समुद्रकिनारे आहेत जिथे इस्त्रायली पर्यटकांचे स्वागत केले जाते आणि त्यांना अत्यंत आदराने वागवले जाते.” सोबतच भारतातील चार सुंदर समुद्रकिनाऱ्यांचे फोटो ही त्यांनी शेअर केले आहेत. ज्या किनाऱ्यांचे फोटो शेअर केले आहेत त्यात लक्षद्वीप, गोवा, अंदमान आणि निकोबार बेट आणि केरळचा समावेश आहे.

इस्रायली पर्यटकांवर बंदी

मालदीव सरकारने रविवारी इस्रायली पासपोर्ट धारकांना त्यांच्या बेटावर प्रवेश करण्यास प्रतिबंध केले आहे. इस्रायली सैन्याने गाझावर केलेल्या हल्ल्यांनंतर मालदीवमध्ये जनक्षोभ वाढला. त्यामुळे तेथील सरकारला हा निर्णय घ्यावा लागलाय. राष्ट्राध्यक्ष कार्यालयात तातडीच्या पत्रकार परिषदेत गृहमंत्री अली इहुसान यांनी हा निर्णय जाहीर केला. मालदीवला दरवर्षी दहा लाखांहून अधिक पर्यटक येत असतात. ज्यामध्ये इस्रायलमधील पर्यटकांची संख्या अंदाजे 15,000 इतकी आहे.

वर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिली होती. त्यानंतर मोदींनी देखील लक्षद्वीपला भेट देण्याचं आवाहन केलं होतं. ज्यावर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या नंतर भारतीय पर्यटकांनी देखील मालदीववर बहिष्कार टाकला होता. ज्याचा मोठा फटका मालदीवला बसला होता. आता मालदीवच्या पर्यटन मंत्र्यांनी भारतीयांना मालदीवला येण्याचं आवाहन केले आहे.