इस्रो चांद्रयान ४: अवकाश आणि अवकाशाशी संबंधित अनेक संकल्पना इस्रोमुळं अगदी सहज आणि सोप्या पद्धतीनं भारतीयांपर्यंत पोहोचल्या आणि याच इस्रोच्या मोहिमेमध्ये संपूर्ण देशाची रुची पाहायला मिळालं. चांद्रयान ३ ला मिळालेलं यश हे याच कुतूहलातील एक महत्त्वाचा टप्पा ठरलं.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोकडून येत्या काळात अशाच काही महत्त्वपूर्ण मोहिमा हाती घेतल्या जाणार असून, अवकाश क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. खुद्द इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांनीच यासंदर्भातील माहिती दिली आहे.
चांद्रयान ३ या मोहिमेला मिळालेल्या यशानंतर आता बरोबर तीन वर्षांनी म्हणजेच २०२७ मध्ये चांद्रयान ४ ही मोहिम इस्रो हाती घेणार आहे.
अद्यापही या मोहिमेसाठी सरकारची औपचारिक परवानगी मिळालेली नाही त्यामुळं अधिकृतरित्यात परवानगी मिळाल्यानंतर या मोहिमेच्या कामांना वेग येणार आहे. असं असलं तरीही या मोहिमेसाठीची प्राथमिक तयारी इस्रोनं आतापासूनच सुरू केली असल्याची माहिती इस्त्रोचे वैज्ञानिक सचिव शंतनू भाटवडेकर माध्यमांना दिली.
चांद्रयान ४ या मोहिमेमध्ये इस्रो चंद्रावरील खडकांचे नमुने आणत त्याचं परीक्षण करण्यासाठी प्रयत्नशील असेल. एकिकडे इस्रोनं आगामी मोहिमांची महत्त्वाकांक्षा बाळगलेली असतानाच दुसरीकडे नासाच्या सोबतीनं इस्रो भारतीय अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्यासाठीही सज्ज झालं आहे. त्यामुळं आगामी वर्षांमध्ये इस्रोकडून देशवासियांच्या अपेक्षा उंचावलेल्या असतील असं म्हणणं गैर ठरणार नाही.
चांद्रयान ४ ही मोहिम इतकी खास का?
चांद्रयान ४ नं चंद्रावरील माती आणि खडकांचे नमुने आणणं अपेक्षित असून, यासाठी या यानाचं सॉफ्ट लँडिंग होणंही तितकंच महत्त्वाचं आहे. याहूनही अधिक महत्त्वाची बाब असेल ती म्हणजे स्पेस डॉकिंग. म्हणजेच इस्रो चांद्रयान ४ ला टप्प्याटप्प्यांमध्ये अवकाशात पाठवणार असून, त्यानंतर अवकाशातच त्याची जोडणी केली जाईल. ही मोहिम इस्रोनं पहिल्यांदाच हाती घेतल्यामुळं आता ही कामगिरी फत्ते करण्यात भारतीय शास्त्रज्ञ यशस्वी ठरतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सोमनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील ५ वर्षांमध्ये इस्रो जवळपास ७० उपग्रह अंतराळात पाठवणार आहे. यामध्ये सर्वात खालच्या कक्षेमध्ये स्थापित केल्या जाणाऱ्या उपग्रहांचाही समावेश राहणार असून, यापैकी ४ सॅटेलाईट एनएव्हीआयसी रिजनल नेविगेशन सिस्टीमसाठी असणार आहेत.