इस्लामिक कट्टरपंथीयांनी हिंदूंच्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, अन्यथा…; विहिंपचा इशारा

मुंबई : “हिंदू समाजावर होणारे हल्ले केवळ हिंदू सणांदरम्यानच नाही तर मोहरम, ईद-ए-मिलाद आणि बारावफात यांसारख्या मुस्लिम समारंभातही होतात. हे हल्ले अत्यंत निंदनीय आणि असह्य आहेत. आता इस्लामिक कट्टरपंथींनी काफिरोफोबियातून बाहेर यायला हवे. हिंदूंच्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका.”, असे म्हणत विश्व हिंदू परिषदेने जिहाद्यांना इशारा दिला आहे. देशभरात दीड डझनहून अधिक ठिकाणी गणेश उत्सवांवर झालेल्या जिहादी हल्ल्यांप्रकरणी विहिंपचे केंद्रीय संयुक्त महामंत्री डॉ. सुरेंद्र जैन यांनी सोमवारी हा इशारा दिला आहे.

 

मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा उल्लेख करत डॉ. सुरेंद्र जैन यावेळी म्हणाले, “जिहादी म्हणतात की तथाकथित मुस्लिम वस्त्यांमधून आणि मशिदींसमोरील रस्त्यावरून हिंदूंच्या मिरवणुका काढू नयेत. यावर मद्रास उच्च न्यायालयाने त्यांना यापूर्वीच उत्तर दिले आहे. त्यामुळे ओवेसी, मदनी, तौकीर सारख्या मुस्लिम नेत्यांनी उच्च न्यायालयाचा हा इशारा समजून घ्यावा. आपण आपल्या समाजाला चिथावणी देणे बंद केले पाहिजे आणि हिंदूंना या मार्गावर जाण्यास भाग पाडू नये.”

पुढे ते म्हणाले, “यापूर्वी सीएएच्या नावाने चिथावणी दिली जात होती, ज्याचा मुस्लिम समाजाशी काहीही संबंध नव्हता. वक्फ बोर्डाच्या नावाखाली काही बड्या मुस्लिम नेत्यांनी सर्वसामान्य मुस्लिम समाजाची सर्वाधिक लूट केली आहे. हे संपूर्ण जगाला माहीत असताना आता वक्फच्या नावावर लोकांना भडकावले जात आहे. हा विकासाचा नसून विनाशाचा मार्ग आहे. मुस्लिम समाजाने स्वतःच्या भवितव्याची काळजी करणे गरजेचे आहे. गझनी, तैमूर, नादिर शाह, बाबर यांसारख्या आक्रमकांचे सध्याचे अवतार सोडा आणि एपीजेंसारखे उत्क्रांतीवादी नेतृत्व स्वीकारा.”