इस्लामी कट्टरतावाद्यांच्या अत्याचाराविरोधात बांगलादेशी हिंदू आक्रमक!

बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरु झालेल्या आंदोलनाने काही दिवसांत हिंसक वळण घेतले. परिस्थिती हाताबाहेर जाताच शेख हसिना यांनी सुद्धा आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देत बांगलादेशातून पळ काढला. यादरम्यान आंदोलनात शिरलेल्या इस्लामिक कट्टरतावाद्यांनी हिंदूंना टार्गेट करण्यास सुरुवात केली. हिंदूंची घरे, मंदिरे, दुकानांवर हल्ले झाले. मात्र आता मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार आल्यानंतर इस्लामी अत्याचाराविरुद्ध बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याक आवाज उठवताना दिसत आहेत. यात महिलांचाही मोठा सहभाग आहे.

बांगलादेशातील गोपालगंज, गायबांध, नराइल यांसारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये हिंदू बांधवर रस्त्यावर उतरून इस्लामिक कट्टरतावाद्यांच्या अमानूश अत्याचाराविरोधात आवाज उठवत आहेत. न्याय मिळवण्याच्या उद्देशाने लाखो हिंदू बांधव निषेध रॅली काढत आहेत. यावेळी नराइलमध्ये जिल्हा दंडाधिकारी कार्यालयासमोर हिंदू अल्पसंख्यांक अत्याचाराच्या विरोधात तीव्र निदर्शनेही करण्यात आली. सुनामगंज जिल्ह्यात झालेल्या निषेध रॅलीमध्ये हजारो हिंदू तरुणांनी ‘जागो रे जागो, हिंदू जागो’ अशा घोषणा दिल्या. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस हिंदू अल्पसंख्याकांच्या मागण्या ऐकण्यासाठी तयार असल्याचे सांगण्यात येत आहे.