ईडीच्या छाप्यांवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : बारामती ॲग्रो गैरव्यवहार प्रकरणी शुक्रवारी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांच्या सहा ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली.शरद गटाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या घरावर ईडीने छापे टाकल्यानंतर त्यांचे हे वक्तव्य समोर आले आहे. याप्रकरणी आपल्या नावाने कुठलीही नोटीस निघाली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

रोहित पवार म्हणाले की, “पवार साहेबांच्या नावाने नोटीस निघाली होती. माझ्या नावाने कुठलीही नोटीस निघाली नाही. माझ्या अधिकाऱ्यांनी ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलीत. मला जेव्हा नोटीस येईल तेव्हा मी तिथे जाऊन जे खरं आहे ते सांगेन. पण यावेळी मी विचार किंवा बाजू बदलेन असं काहीही होणार नाही. माझे विचार आणि लहानपणापासूनची शिकवण नक्कीच याबद्दलची दक्षता घेईल.”

ते पुढे म्हणाले की, “आम्ही ईडीला सगळे कागदपत्रे दिलेली आहेत. मी खरंच चुक केली असती तर भारताबाहेर असताना मी परत आलो नसतो. तसेच चुक केली असती तर मी अजितदादांबरोबर जाऊन बसलो असतो. आमच्यासाठी विचार आणि महाराष्ट्र धर्म महत्त्वाचा आहे. आम्ही आमचा लढा तसाच सुरु ठेवू. ईडी असो किंवा कुठलाही विभाग असो त्यांना जे काही सहकार्य लागेल ते आम्ही करत राहू,” असेही ते म्हणाले.