उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर, शरद पवारांकडून बंद मागे घेण्याचे आवाहन

मुंबई : उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंदबाबत दिलेल्या निर्णयानंतर आता शरद पवारांनी संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्या, असे आवाहन केले आहे. कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नसून हा बंद बेकायदेशीर आहे, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला होता. यावरून आता शरद पवारांनी बंद मागे घेण्याचे आवाहन केले आहे.

शरद पवार म्हणाले की, “बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता.”

“हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि मुंबई उच्च न्यायालयाने सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले आहे.

दुसरीकडे, उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतरही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी हा बंद होणारच असल्याचे म्हटले होते. परंतू, आता शरद पवारांनी बंद मागे घेण्याचे आवाहन केले आहे. यावर आता महाविकास आघाडीचे इतर नेते काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.