पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर ‘भाजप उत्तरेत विजयी, तर काँग्रेसचा दक्षिणेत विजय’ असा राष्ट्रीय एकात्मतेला घातक अपप्रचार करण्यात काँग्रेससह काही मोदीद्वेष्ट्या माध्यमांनी धन्यता मानली. त्यामुळे केवळ राजकीय प्रचारासाठी काँग्रेसने अवलंबलेले उत्तर-दक्षिण असे अमंगळ भेदाचे हे नवे घातक तंत्र देशाच्या विभाजनाला खतपाणी देणारेच म्हणावे लागेल.
भारत हा वैविध्यपूर्ण संस्कृतींमुळेच जगभरात ओळखला जातो. संस्कृती, भाषा आणि प्रदेश यांचे वेगळेपण भारताला समृद्ध सांस्कृतिक ओळख देत असताना, आता काँग्रेसने ‘उत्तर विरुद्ध दक्षिण’ असे देशाचे विभाजन करण्याचा घाट घातलेला दिसतो. त्याला काही ठरावीक माध्यमे ठळकपणे प्रसिद्धी देत आहेत. म्हणूनच विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर ‘उत्तरेत भाजप तर दक्षिणेत काँग्रेस विजयी,’ असे मथळे मुद्दाम दिले गेले. राष्ट्रीय एकात्मतेला नख लावण्याचाच हा प्रयत्न. भाजपची प्रतिमा दक्षिणविरोधी अशी रंगवली जाते आणि हा पक्ष उत्तर भारतीयांचा आहे, असा कांगावा करायचा, हे घातक असे नवे तंत्र काँग्रेसने प्रचारासाठी आत्मसात केले आहे. काँग्रेस स्वतः अस्तित्वाची लढाई लढत असताना, देशाचे प्रादेशिक ध्रुवीकरण करण्याच्या प्रयत्नात आहे. दक्षिणेतील प्रादेशिक पक्ष तसेच डाव्यांचीसुद्धा हीच विचारधारा आणि त्यालाच काँग्रेस राष्ट्रीय पातळीवर नेण्याचा केविलवाणा प्रयत्न पराभूत काँग्रेसींनी केला.
काँग्रेस आणि काँग्रेसी माध्यमे वास्तवाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. कर्नाटक जिंकून भाजपने त्याची विचारधारा दाक्षिणात्य राज्यातही रूजवली होतीच. मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण झाल्याने, कर्नाटकात भाजपचा गेल्या निवडणुकीत पराभव झाला. पण, परवा समोर आलेल्या तेलंगण विधानसभा निकालातही भाजपच्या मतांची टक्केवारी वाढलेली दिसते. २०१८च्या निवडणुकीत भाजपने ६.१० टक्के इतकी मिळवली होती आणि तिथे भाजपचा उमेदवार केवळ एकाच जागेवर विजयी झाला होता. यंदा भाजपने तेथे १४ टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळवत, आठ जागांवर विजय मिळवला आहे. भाजपचे उमेदवार के. रेड्डी यांनी बीआरएसचे सर्वेसर्वा केसीआर तसेच काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार रेवंत रेड्डी यांचा पराभव केला.
‘सागरमाला’ प्रकल्प तसेच ‘चेन्नई-बंगळुरू इंडस्ट्रियल कॉरिडोर’ यांसारख्या केंद्र सरकारच्या योजनांचा दक्षिणेकडील राज्यांना फायदा होत आहे. मात्र, काही माध्यमे उत्तर-दक्षिण विभाजनाला हवा देण्याचे काम करताना दिसतात. देशाचे असे विभाजन करणे, हे राष्ट्रीय एकात्मता तसेच विकासाला अडसर ठरु शकते. कारण, हा अपप्रचार फुटीरतावादी राजकारणाला, शक्तींना अधिक बळ देतो. प्रादेशिक पक्ष याचेच भांडवल करून पुनःपुन्हा सत्तेवर येत राहतात. केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांना विरोध करणारे हे प्रादेशिक पक्षच असतात. सुदैवाने काही विचारवंत, कार्यकर्ते हा भेदभाव दूर करण्यासाठी कार्यरत आहेत. त्यांच्यामुळेच भारताला एकत्र बांधणारी सामायिक मूल्ये आणि सांस्कृतिक धागे अधोरेखित होतात. शिक्षण, आरोग्यसेवा आणि पायाभूत सुविधा यांसारख्या क्षेत्रातील त्यांचे कार्य प्रादेशिक सहकार्याला प्रोत्साहन देते. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाने केलेल्या अपप्रचारापेक्षा हा नैसर्गिक प्रचार सकारात्मक ठरत आहे.
भाजपने दक्षिणेत केलेली कामगिरी ही संमिश्र स्वरुपाची आहे, असे म्हणता येईल. भाजपने दक्षिणेची द्वारे उघडण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश म्हणून कर्नाटकच्या रुपाने त्यांना तेथे प्रवेश मिळाला. कर्नाटकात २०१४ पासून भाजप सत्तेत राहिला. मुस्लीम मतांच्या ध्रुवीकरणामुळे त्याला ६५ जागांवर पराभव स्वीकारावा लागला, अन्यथा, दक्षिणेतील या राज्यात भाजपची सत्ता राहिली असती. केरळ हा काँग्रेस तसेच डाव्यांचा बालेकिल्ला. येथेही भाजपने लक्षणीय प्रगती केली. हिंदू मतांच्या एकत्रीकरणासाठी भाजप प्रयत्नात आहे. मतांच्या तुष्टीकरणाचे राजकारण डाव्यांकडून केले जाते. याला प्रत्युत्तर म्हणून भाजप हिंदू मतदारांना एक करत आहे. वाढते मताधिक्य विजयी जागांमध्ये रुपांतरित करणे, हे आव्हान भाजपसमोर आहेच. तामिळनाडूत भाजप मर्यादित असला, तरी येथे भाजप मोठ्या प्रमाणात जनसंपर्कावर भर देत आहे. याचाच एक भाग म्हणून तामिळनाडूच्या २३४ विधानसभा क्षेत्रांना भेट देणार्या पदयात्रेचे आयोजन भाजपने केले. दि. २८ जुलै रोजी तिचा प्रारंभ झाला. जानेवारी २०२४ मध्ये तिची सांगता होईल. अण्णामलाई यांच्या नेतृत्वाखालील या पदयात्रेत भाजपचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम केले जात आहे. तामिळनाडू सरकारविरोधात अण्णामलाई यांनी घेतलेली भूमिका जनतेला भावत आहे. आंध्र प्रदेश तसेच तेलंगण येथे भविष्यात पक्ष अधिक चांगली कामगिरी करेल, असा विश्वास आहे.
दक्षिणेकडील राज्यातील मतांची वाढती टक्केवारी ही भाजपच्या दृष्टीने जमेची बाजू. पक्षाच्या विचारसरणीला लोकमान्यता मिळत असल्याचेच हे संकेत. भाजपने दक्षिणेत यशस्वी होण्यासाठी हिंदुत्वाला प्राधान्य दिले. तेथील प्रादेशिक पक्ष तसेच काँग्रेस पक्ष तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याने, बहुसंख्य हिंदूंचा संकोच होत आहे. म्हणूनच भाजपने हिंदुत्व आपल्या अजेंड्यावर घेतले. तथापि, येथे अल्पसंख्यांकही ‘बहुसंख्य’ असल्याने, त्याचा परिणाम भाजपच्या मतांवर होत आहे. भाजपच्या वाढीसमोर काही आव्हाने असली, तरी त्यावर मात करून येत्या काळात भाजप येथेही चांगली कामगिरी करेल, असा विश्वास नक्कीच आहे.
एक प्रमुख राष्ट्रीय पक्ष अशी ओळख असलेला काँग्रेस दक्षिणेत मात्र सातत्याने सत्तेपासून दूर जाताना दिसून येतो. म्हणूनच एका छोट्या राज्याच्या विजयानंतर ‘काँग्रेसचा दक्षिणेत विजय,’ असा मथळा काँग्रेसी माध्यमांना अधिक भावणारा ठरला.
द्रमुक, अण्णाद्रमुक, टीआरएस, जेडीएस यांसारख्या प्रादेशिक पक्षांच्या उगमानंतर काँग्रेस दाक्षिणात्य राज्यातून हद्दपार होताना दिसून आली. प्रादेशिक अस्मितेला प्राधान्य देणार्या, या पक्षांसमोर काँग्रेस हतबल ठरली. भाषिक वाद, पाणी वाटपाचा तिढा तसेच सांस्कृतिक अस्मिता यांसारखे मुद्दे राष्ट्रीय प्रश्नांपेक्षा अधिक प्रभावी ठरले. म्हणूनच काँग्रेसला येथे पराभवाचा सामना करावा लागला. तशातच भाजपचा येथे होत असलेला उदय काँग्रेससाठी अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित करणारा ठरला आहे. तेलंगणच्या निर्मितीत काँग्रेसची भूमिका ही विरोधाची होती. तथापि, याचा राजकीय लाभ घेण्याच्या दृष्टीने काँग्रेसने ती मान्य केली. काँग्रेसने दक्षिणेत केले, ते केवळ राजकारण. प्रादेशिक अस्मिता, संस्कृती यांच्याशी काँग्रेसला काहीही देणेघेणे नाही. राजकीय फायद्यासाठी उत्तर विरोधात दक्षिण असा भेद काँगे्रस निर्माण करत आहे. राजीव गांधी यांचे मारेकरी हे तामिळ होते. तामिळनाडूच्या विरोधात घेतलेली भूमिकाच काँग्रेसचे उच्चाटन करणारी ठरली, हा तर इतिहास.
आज केंद्र तसेच राज्य पातळीवर काँग्रेस अस्तित्वाची लढाई लढत आहे. भाजपने ‘काँग्रेसमुक्त भारत’ ही जी घोषणा दिली होती, त्याचा परिणाम म्हणून देशातील जवळपास सर्वच प्रमुख राज्यांतून काँग्रेस सत्तेपासून दूर गेली आहे. भाजप दाक्षिणात्य राज्यात काँग्रेससमोर प्रबळ आव्हान उभे करत आहे. केंद्रीय अर्थमंत्री या स्वतः तामिळनाडूच्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात अनेक दाक्षिणात्यांच्या समावेश आहे. ‘काशी तमिळ संगमम’ यासारखा प्रकल्प भाजपच्या पुढाकाराने साकारला आहे. दक्षिणेत भाजपला मिळणारे यश हे राजकीय व्यावहारिकता तसेच सांस्कृतिक सहभाग, पारदर्शकता तसेच प्रादेशिक सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी केलेले प्रयत्न यांचा समतोल साधण्यावर अवलंबून आहे. जानेवारीत अयोध्येतील श्रीराम मंदिराचे लोकार्पण झाले की, दक्षिणेतील हिंदूंवर त्याचा निश्चितच सकारात्मक प्रभाव पडणार आहे, हे निश्चित!