मुंबई : सत्तेसाठी लाचार झालेले काँग्रेसच्या मांडीला मांडली लावून बसलेले उद्धव ठाकरे काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसताच आता त्यांनी काँग्रेसी दुपट्टाही स्वीकारला. बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसी विचारधारेचा कायम विरोध केला. माझ्या शिवसेनेची कधीही काँग्रेस होऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. मात्र, उद्धव ठाकरेंनी सर्वकाही धुळीला मिळवून फक्त सत्तेसाठी हिंदुत्वााला आणि भगव्याला तिलांजली देऊन काँग्रेसचा पट्टा गळ्यात घातला, असा आरोप भाजपने ठाकरेंवर केला आहे.
भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंनी यावरुन ठाकरेंना लक्ष्य केले आहे. “ज्या बाळासाहेब ठाकरे यांची सगळी हयात काँग्रेसी विचारधारेच्या विरोधात गेली, ज्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी रक्ताचं पाणी आणि हाडाची काडं करून शिवसेना स्थापन केली, रुजवली आणि वाढवली; त्याच बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे हे केवळ राजकीय स्वार्थासाठी काँग्रेसचे उपरणे गळ्यात घालून बसले आहेत. आपली मूळची विचारधारा काँग्रेसच्या पायात आणि काँग्रेसचे उपरणे स्वतःच्या गळ्यात, अशी अवस्था आता उद्धव ठाकरे यांची झाली आहे.”, अशी टीका त्यांनी केली आहे.
उबाठा’ने काँग्रेसची लाचारी पत्कारल्याची टीका महायुतीच्या नेत्यांकडून सुरू असताना, उद्धव ठाकरेंनी गळ्यात चक्क काँग्रेसचा पट्टा (उपरणे) घातल्याने चर्चांना उधाण आले आहे. याची चर्चा होईल, याचा अंदाज आल्याने त्यांनी भाषणात सारवासारव करीत विषय हसणवारीवर नेला.
काँग्रेसच्या सद्भावना दिवसानिमित्त आयोजित संकल्प मेळाव्याला मंगळवार, दि. २० ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरेंनी हजेरी लावली. या वेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार, काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांच्या गळ्यात काँग्रेसचे उपरणे घालण्यात आले. माध्यमांच्या नजरा त्याकडे वळल्यानंतर उद्धव ठाकरे सावध झाले. शरद पवारांनी उपरणे बाजूला काढून ठेवताच, लागोलग ठाकरेंनीही त्यांचे अनुकरण केले.
काँग्रेस आमदार भाई जगतापांनी उपरणे गळ्यातच ठेवावे, असा आग्रह धरला. मात्र उद्धव ठाकरे यांनी हसत हसत त्याला नकार दिला. संजय राऊतांनी आपल्या गळ्यातील उपरणे शेवटपर्यंत काढले नाही. माध्यमांनी उद्धव ठाकरेंची कृती कॅमेऱ्यात टिपल्याने त्यांना सारवासारव करावी लागली. आपल्या भाषणात ते म्हणाले, काँग्रेसच्या कार्यक्रमाला असल्याने मी गळ्यात गमछा घातला. तुमचा आदर ठेवला, मान ठेवला. पण उद्या याचा नक्की फोटो येणार. तो फोटो यावा यासाठीच मी काँग्रेसचा गमछा गळ्यात घातला होता. मी इकडे तिकडे काय करतो, त्याकडे विरोधकांचे जास्त लक्ष असते. तुम्ही दाखवा काय दाखवायचे ते, असेही ठाकरेंनी सांगितले.