मुंबई : उद्धव ठाकरेंची भाषा ही महाराष्ट्रातील तमाम जनतेला लाज आणणारी आहे, अशी टीका भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंनी बुधवारी एका मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. यावर आता केशव उपाध्येंनी प्रत्युत्तर दिले.
केशव उपाध्ये म्हणाले की, “उद्धव साहेब आपण महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या स्तराला घेऊन जाताय हे बघा. यशवंतराव चव्हाणांपासून वसंतराव नाईकांपर्यंत, वसंतदादा पाटलांपासून शरद पवारांपर्यंत, बाळासाहेब ठाकरेंपासून गोपीनाथ मुंडे – प्रमोद महाजन यांच्यापर्यंत या महाराष्ट्राने एक सुसंस्कृत राजकारण केलं आहे.”
“जात, मतभेद नक्की होते मात्र अशी एकमेकाला संपवण्याची भाषा कधी कोणी केली नव्हती. आज तुम्ही सत्तेसाठी स्वतःचा विचार बाजारात विकून येताय आणि राजकारणातून विरोधकांना संपवून टाकण्याची भाषा करताय हे कितपत योग्य आहे हे बघा. दुर्दैवाने का होईना पण तुम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या एका माजी मुख्यमंत्र्यांच्या तोंडी अशी भाषा ही महाराष्ट्रातील तमाम जनतेला लाज आणणारी आहे,” असेही ते म्हणाले.