उद्धव ठाकरेंची वाट लागली

अहंकाराच्या आहारी जाऊन चुकीचे मित्र जवळ करणाऱ्या नेत्याचे काय हाल होतात. ते सांगायचे असेल तर उद्धव ठाकरे यांच्याकडे बोट दाखवावे लागेल. पाच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांचा काय रुबाब होता आणि आज कोणी विचारत नाही. उद्धव ठाकरे यांची पुरती वाट लागली आहे. त्यांचे दोन्ही हातच नव्हे तर दोन्ही पाय रिकामे झाले आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपासोबत युती करून शिवसेना लढली. मात्र, निकाल येताच ठाकरे दोन काँग्रेससोबत जाऊन बसले. मुख्यमंत्री व्हायची त्यांची खाज भागली. पण अडीच वर्षांतच घरी बसावे लागले. त्यांच्या आमदारांनीच त्यांच्या विरोधात बंड केले. हातची सत्ता गेली, पक्ष गेला, निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गेले. उरलासुरला गेम संजय राऊत यांनी खल्लास केला.

१६ बंडखोरांना अपात्र ठरवून अद्दल घडविण्याची उद्धव यांची शेवटची धडपडही फुकट गेली. दीड वर्षापासून सुरू राज्यातल्या सत्तासंघर्षावर आलेल्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या ताज्या निकालामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिल्लक सेनेला आता तोंड लपवायलाही जागा उरली नाही. एक एक पत्ता खुलत आहे तस तसे उद्धव ठाकरे अधिकाधिक उघडे पडत आहेत. चार महिने होऊन गेले. ठाकरे ज्यांच्या तंबूत घुसले तिथे जागावाटपाचा तिढा झाला आहे. लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरले आहेत. मात्र, जागावाटप रखडले आहे. निकालानंतरच हरलेत्या जागांचे वाटप होईल अशीच एकूण लक्षणे आहेत. राज्यात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. यातल्या निम्म्या जागांसाठी काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने २६ जागा लढवल्या होत्या, त्यांना फक्त चंद्रपूरची एकच जागा जिंकता आली होती. मात्र, आता कॉंग्रेस २५ जागांवर दावा सांगते आहे. ठाकरे गटही तीच टेप वाजवतो आहे. गेल्या वेळी २३ जागा लढवल्या म्हणून आम्हालाही तेवढ्याच जागा हव्यात, असा हट्ट ठाकरे गटाने धरला आहे. काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी शिल्लक सेनेची लायकी काढली तेव्हा आम्ही थेट दिल्लीत हायकमांडशी बोलू, असे संजय राऊत म्हणाले. पण आता दिल्लीश्वरांनीही राऊत यांना फटकारले आहे. आम्ही देऊ तेवढ्या जागा घ्या, २३ जागा पाहिजे असतील तर अमित शाह यांच्याकडे उद्धव ठाकरेंची वाट लागली जा, अशा शब्दात दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी झापल्याची कुजबुज ऐकू येत आहे. गेल्या निवडणुकीत ठाकरेंनी २३ जागा लढवल्या आणि त्यातल्या १८ जागा जिंकल्या, हे खरे आहे. पण त्यावेळी त्यांच्यासोबत भाजपा होती, हे ठाकरे सोयीस्कर विसरतात. युतीत दोघे लढले होते. आज पुलाखालून खूप पाणी वाहून गेले आहे.

तब्बल १३ खासदार ठाकरेंना सोडून गेले आहेत. सत्तेच्या लालसेने चांगला मित्र गमावला. सोनिया गांधी आणि शरद पवार आता अंगठा दाखवत आहेत. शिवसेना २५ वर्षे युतीत सडली, असे उद्धव ठाकरे युती तोडताना म्हणाले होते. आज त्यांची काय परिस्थिती आहे? चारच वर्षांत गांधी-पवार टोळीने ठाकरेंना इतकं सडवलं की, त्या दुर्गंधीने आता मतदारही दूर पळतो आहे. ठाकरे हे एक्सपायरी डेट संपलेले इंजेक्शन आहे, हे धूर्त सोनिया गांधींनी केव्हाच हेरले. त्यामुळे तुम्ही पाहाल, सोनिया फेकतील तेवढ्या जागा ठाकरेंना झेलाव्या लागतील. कारण, उद्धव यांच्यासाठी आता भाजपाचे दरवाजे केव्हाच बंद झाले आहेत. राष्ट्रीय नेते होण्याच्या धुंदीत उद्धव इंडिया आघाडीत गेले. पण तिथेही त्यांना कोणी विचारत नाही. आपण मोठे मुत्सद्दी आहोत, हे दाखवण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी ते थेट युती करून बसले. मात्र, इंडियामध्ये आंबेडकर पांना घ्यायचे की नाही, हे ते ठरवू शकलेले नाही. कारण, काँग्रेसचा लाल बावटा, काय लाचार अवस्था झाली पहा उद्धव ठाकरेंची. एकेकाळी बोलणी करायला भाजपाची हायकमांड त्यांच्या घरी म्हणजे मातोश्रीवर येत असे. आता ठाकरेंना दिल्लीतील मातोश्रीच्या घरी चपला घासाव्या लागत आहेत. तुम्ही पहा. गेल्या चार वर्षात सोनिया गांधी किंवा राहुल गांधी चुकूनही मातोश्रीवर फिरकलेले नाहीत. ठाकरेंनी केवळ भाजपाला गमावले नाही. त्यांनी स्वतःचे स्वातंत्र्यही गमावले आहे. काँग्रेस म्हणेल तसे आता त्यांना रांगावे लागेल. ठाकरेंची गरज आता संपली आहे. मित्र पक्षांसाठी ठाकरे आता निव्वळ ओझे झाले आहे. त्यांच्याबद्दलची सहानुभूतीही आता लोक विसरले आहेत.

त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदयसम्राट होते. उद्धव आता स्वतःला सम्राट तर दूर साधे हिंदू म्हणवून घ्यायच्या लायकीचे राहिलेले नाहीत. काँग्रेसच्या मागे फरफटत जाणे, हेच आता त्यांच्या नशिबी आहे. याला ते स्वतःच जबाबदार आहेत. अयोध्येतल्या प्रभू राम मंदिराचा साधा विषय घ्या. २२ जानेवारीला राम मंदिराचे लोकार्पण व रामललाची प्राणप्रतिष्ठा आहे. या आनंदोत्सवात ठाकरे यांना सहज सहभागी होता आले असते. चार वर्षांत केलेल्या चुकांचे प्रायश्चित घेता आले असते. उद्धव यांनी ती संधीसुद्धा गमावली. आमंत्रण नाही म्हणून थयथयाट केला, राम कोणाची खाजगी प्रॉपर्टी नाही, असे अकलेचे तारे तोडले. उद्धव यांनी त्या दिवशी नाशिकच्या काळाराम मंदिरात जायचे ठरवले आहे. काय गंमत आहे पहा. प्रभू राम तब्बल १४ वर्षे पंचवटीत वनवासात होते. ते परत अयोध्येत येत आहेत त्या दिवशी उद्धव ठाकरे पंचवटीत जात आहेत. तसाही त्यांचा राजकीय वनवास सुरू झाला आहे. त्यामुळे त्यांना पंचवटीच आठवणार, सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी अयोध्येचे निमंत्रण नाकारले आहे. उद्धवही त्यांच्याच रांगेत बसले आहेत. सोनिया गांधी अयोध्येला जायला घाबरतात. अयोध्येत गेले तर हिंदू कितपत खुश होतील पाचा त्यांना भरवसा नाही. मात्र, एक नक्की आहे. तिकडे गेले तर मुसलमान नाराज होतील, अशी त्यांना भीती आहे. काँग्रेसची व्होट बँक आटली आहे. हिंदूंची मतं मिळवण्याच्या धडपडीत मुसलमानांची उरलीसुरली २० टक्के व्होट बँकही हातातून गेली. आपले हाल कुत्रे खाणार नाही, ही गोष्ट सोनिया चांगली जाणतात. सोनिया यांचे ठीक आहे. पण उद्धव यांचे काय? त्यांनीही मुसलमानांचे नेते व्हायचा चंग बांधलेला दिसतो. माझे हिंदुत्व वेगळे आहे, असे उद्धव वारंवार ऐकवतात. हे कसे वेगळे आहे हे आता लोकांच्या लक्षात येऊ लागले आहे. तुम्ही लिहून ठेवा. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची एक जागा निवडून आली होती. या निवडणुकीत शिल्लक सेनेची एकही जागा येणार नाही. कोणेएकेकाळी उद्धव ठाकरे नावाचा एक नेता होता. त्याने पार्टी बुडवली अशी नोंद इतिहासात वाचायला मिळेल.

प्रासंगिक मोरेश्वर बडगे
९८५०३०४१२३
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)