मुंबई : आम आदमी पक्ष मुंबईत स्वबळावर विधानसभा निवडणूका लढवणार आहे. आपच्या नेत्या प्रिती शर्मा मेनन यांनी याबाबतची माहिती दिली असून विधानसभेत आमची कोणाशीही यूती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
प्रिती शर्मा मेनन म्हणाल्या की, “आम आदमी पार्टी महाराष्ट्रात निवडणूका लढणार आहेत. दरम्यान, मुंबईत आम्ही सर्व ३६ जागांवर उमेदवार उभे करणार आहोत. इथे आमचा मोठा मतदार आहे. त्यांना एक कल्याणकारी सरकार हवे आहे. त्यांच्या भरवश्यावर आम्ही मुंबईत सर्व जागांवर लढणार आहोत.”
“आम आदमी पार्टी इंडी आघाडीमध्ये नेहमीच राहणार आहे. इंडी आघाडी ही लोकसभेसाठी होती. राष्ट्रीय पातळीवर ती राहणारच आहे. पण विधानसभा निवडणूका वेगळ्या असतात. यामध्ये आमची कोणाशीही यूती नाही. दिल्ली, पंजाब, हरियाणा या सगळ्या ठिकाणी आम्ही स्वबळावर लढणार आहोत,” असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, विधानसभा निवडणूकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. यातच उद्धव ठाकरे हे तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर असून ते काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत. यावेळी जागावाटपाची चर्चा होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, आम आदमी पक्षाने मुंबईत स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.