शिल्लक सेनेचे सुप्रीमो उद्धव ठाकरे यांनी खरे तर शिमग्याला मेळावा घ्यायला पाहिजे. दसरा म्हणजे हिंदूंचा मंगल सण. विजयादशमी. विजयाची भाषा केली पाहिजे. सीमोल्लंघन केलं पाहिजे. पण शिव्याशाप देण्यापलीकडे हा माणूस काही बोलूच शकत नाही.हातातले सरकार गेले, पक्षही गेला. त्यामुळे आलेले वैफल्य प्रचंड आहे. दीड वर्षे उलटूनही ठाकरे त्या वैफल्यातून बाहेर येऊ शकलेले नाहीत. मुंबईत शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यातील त्यांचे भाषण हेच सांगते. तोच तो उसना आणलेला आवेश. तोच तो मोदी द्वेषाचा अजेंडा. जाळून टाकू, गाडून टाकू, उलटे टांगू… हे इशारे. दसर्याला तरी शुभ बोला. ते होणे नाही. वैफल्यग्रस्त नेत्याकडून दुसरी अपेक्षा तरी काय करायची? त्या तुलनेत शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा विचारांचे सोने लुटून गेला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बोलण्यात यावेळी कमालीचा आत्मविश्वास झळकला. उद्धव ठाकरे हमासचीही गळाभेट घेतील या एकाच वाक्यात त्यांनी उबाठाचा समाचार घेतला. भाषणाच्या मध्यंतरी व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेजवळ ते गेले.
महाराजांची शपथ घेऊन आपण मराठा समाजाला आरक्षण देण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. दसर्याच्या सामन्यात शिंदे यांचा हा विजयी षटकार होता. या एकाच कृतीने त्यांनी विरोधकांना खाऊन टाकले. उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे नुसते अकांडतांडव होते. धारावी तुमच्या मित्राला गिळू देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी अदानी यांचे नाव न घेता म्हटले. मुंबई तोडायचा प्रयत्न केला तर जाळून टाकू, असे म्हटले. भाजपवाले जातात तिथे सत्यानाश करतात, असे म्हणाले. मग पाच वर्षे भाजपासोबत सत्ता भोगताना गुदगुल्या का होत होत्या? ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्या धुंदीत त्यांनी शरद पवारांशी जुगाड केला. 2019 ची निवडणूक भाजपासोबत युतीत लढले. मात्र, निकाल येताच आमचे दरवाजे मोकळे आहेत, असे म्हणाले. मुख्यमंत्रिपदाची खाज ठाकरेंनी अर्धवट भागवली; पण आज कुठेही नाहीत. अडीच वर्षांत घरी बसावे लागले. तसेही सत्ताकाळातही ते घरीच होते. आता सत्तेची चटक लागली आहे. काहीही करून सत्ता पाहिजे. मुख्यमंत्रिपद मिळत नसेल तर किमान रिमोट कंट्रोल पाहिजे.
या माणसाला सत्तेची एवढी भूक लागली आहे की, मिळेल त्या दगडाला शेंदूर फासणे सुरू केले आहे. फारशा चर्चेत नसलेल्या समाजवादी परिवाराला नुकतीच त्यांनी मिठी मारली. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी त्यांनी मागेच युती केली आहे. मुस्लिमांपासून समाजवाद्यांपर्यंत सर्वांना मिठी मारली आहे या बिन जबड्याच्या वाघाने. कट्टर शिवसैनिकांना कधीही हे अपेक्षित नव्हते. बाळासाहेबांनी ज्यांना नाकारलं त्यांचे उद्धव तळवे चाटत आहेत. वाघाच्या या वात्सल्यवाटा किती फसव्या आहेत, ते काळच सांगेल. हा नकली वाघ नकली मित्रांच्या शोधात असतो. विचित्र महत्त्वाकांक्षेने त्यांना पछाडले आहे. उद्धव 25 विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत घुसले आहेत. इंडियाचे कुटुंबप्रमुख म्हणवून मिरवून घेत आहेत. उद्धव हे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना गद्दार म्हणतात. पण मग त्यांच्याकडे येणारे पवित्र कसे? आम्हाला त्रास देणार्यांना आमचे सरकार आल्यावर उलटे टांगू, असे उद्धव म्हणतात.
2024 मध्ये सरकार आणणार म्हणजे आणणारच, असेही उद्धव म्हणाले. यातला च दाबून म्हणण्याची त्यांची नेहमीची स्टाईल आहे. नऊ वर्षांत हजार वेळा त्यांनी च म्हटले असेल. शेतकर्यांचा 7/12 कोरा करणारच, शेतकर्याच्या बांधावर जाऊन मदत करणारच, शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्याचे स्वप्न पूर्ण करणारच ही वक्तव्ये त्यांच्याच तोंडची.यातला एकतरी च पूर्ण केला का? एकाच पक्षाचे पाशवी बहुमत असलेले सरकार नको. सगळ्यांना सोबत घेऊन जाणारे आघाडी सरकार पाहिजे, असे बोलून तर उद्धव यांनी कहर केला. दुबळे सरकार मजबूत असतं, असा शोध त्यांनी लावला. नरसिंहराव, मनमोहन सिंग, वाजपेयी यांच्या आघाडी सरकारची उदाहरणे त्यांनी दिली. त्यांना आघाडी सरकार पाहिजे म्हणजे पंतप्रधानाला हवा तसा वाकवता येईल. घोटाळे करता येतील.आघाडी सरकारं असताना लहानसहान पक्षांनी घातलेला धुमाकूळ लोक विसरलेले नाहीत.
ममता, जयललिता तर धमक्या घालायच्या. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाचे बहुमताचे सरकार आले. गेल्या नऊ वर्षे देशात भक्कम स्थिर सरकार आहे. त्याचे फायदे उघड दिसताहेत. देश चौफेर प्रगती करतो आहे. महाशक्ती होण्याची स्वप्नं पाहतो आहे. जग भारताला गंभीरपणे घेऊ लागले आहे. बहुमताच्या सरकारमुळेच हे साध्य होऊ शकले. उद्धव मात्र म्हणतात, एका पक्षाचे सरकार नको. का नको?तुम्हाला भानगडी करता येणार नाहीत म्हणून? अडीच वर्षांच्या महाआघाडी सरकारच्या काळात झालेले घोटाळे बाहेर आले आहेत. कोरोना महामारीतही लुटमार झाली. पोलिसांनी अशा सर्वांच्या फाईली उघडल्या आहेत. पण खरेच उद्धव यांना दुबळं सरकार का हवं असेल? त्यांना दुबळं आघाडी सरकार हवं. कारण, विरोधकांमध्ये स्वबळावर सत्तेत येण्याची ताकद नाही. जनता त्यांना स्वीकारत नाही. कारण विश्वासार्हता नाही. कडबोळ्यांचं जनता पक्षाचे सरकारही टिकू शकले नव्हते.
यांची इंडिया आघाडी तर डिस्को दांडिया आहे. सत्तेत येण्याची आशा नाही म्हणून तुकडे-तुकडे सरकारची भाषा सुरू झाली आहे. म्हणजे निवडणुकीआधीच ठाकरे यांनी पराभव मान्य केला. मतदार हल्ली हुशार झाले आहेत. दुबळे सरकार यावे, असा विचार इंडियाचा मतदारही करणार नाही. उद्धव यांना खिचडी सरकार सोयीचे आहे. कुटुंबप्रमुख म्हणून त्यांनी स्वतःच राज्याभिषेक करून घेतला असल्याने महाआघाडीचे मुख्यमंत्रिपद आपल्याकडेच येईल, असा उद्धव यांचा हिशोब आहे. म्हणजे घरी बसून राज्य चालवता येईल. कुठलेही खाते न सांभाळणारा, कुठलीही जबाबदारी न घेणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने प्रथमच पाहिला. राहुल गांधी आणि उद्धव यांचे जमते ते त्यामुळेच. दोघांचीही कुंडली एक आहे. दोघांनाही कसलीही जबाबदारी नको. मात्र, सत्ता पाहिजे, हातात रिमोट कंट्रोल पाहिजे. काँग्रेसमध्ये तेच सुरू आहे. मल्लिकार्जुन खडगे कागदावर अध्यक्ष आहेत. मात्र, राहुल गांधी यांच्या संमतीशिवाय काँग्रेसमध्ये पानही हलत नाही.
काँग्रेससोबत जाण्यापेक्षा मी शिवसेनेचे दुकान बंद करीन, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. काँग्रेससोबत जाऊन उद्धव यांनी वडिलांचा शब्द तर मोडलाच; उलट माझा बाप चोरला, असा ओरडाही ते करतात. नेता किती ढोंगी असावा? ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान करण्यासाठी शरद पवार या वयात धडपड करीत नाहीत. त्यांना त्यांच्या मुलीला राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री करायचे आहे आणि पुतण्याला अद्दल घडवायची आहे. ते होणे नाही. निवडणुकीआधीच इंडियाच्या चिंधड्या उडालेल्या असतील. महाआघाडीची गाजराची पुंगी राहुल गांधी मोडून खाताना दिसतील आणि उद्धव एकदम एकटे असतील. मोदी हरावेत यासाठी विरोधक देव पाण्यात बुडवून बसले आहेत; पण हरवणार कोण? प्रत्येकाला दुसरे कोणीतरी हरवावे, असे वाटते.
– मोरेश्वर बडगे