उद्धव ठाकरेंवर मातोश्री सोडून राहूल गांधी आणि खर्गेंच्या दारी उभं राहण्याची वेळ!

मुंबई : मातोश्री सोडून राहूल गांधी आणि खर्गेंच्या दारात उभं राहण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर आली आहे, अशी टीका भाजप नेते रावसाहेब दानवेंनी केली. उद्धव ठाकरे जागावाटपाच्या चर्चेसाठी तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. यावर आता दानवेंनी टीका केली आहे.

रावसाहेब दानवे म्हणाले की, “महाराष्ट्रात लवकरच विधानसभेच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. या निवडणूकीमध्ये यशस्वी होण्यासाठी काही विरोधी पक्ष प्रयत्न करत आहेत. परवा उद्धव ठाकरे साहेब दिल्लीला जाऊन आलेत आणि दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी जनतेच्या न्यायालयात जाऊन आम्ही न्याय मागणार आहोत, असं त्यांनी सांगितलं. पण २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी जनादेश ठोकरून असंगाशी संगत केली आणि आपलं सरकार बनवलं. या पत्रकार परिषदेत त्यांनी मी किती चांगला मुख्यमंत्री होते हे दाखवण्याचासुद्धा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या मित्राने आपल्या पुस्तकात लिहिलं की, ‘उद्धव ठाकरे आपल्या पूर्ण कार्यकाळात फक्त एकदा मंत्रालयात आले याची मला खंत वाटते.’ याचा अर्थ उद्धव ठाकरे हे सर्वात अपयशी मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांनी जनादेशाची भाषा वापरणं चुकीचं आहे.”

 

“ज्यावेळी देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे दिल्लीला जायचे तेव्हा आम्ही महाराष्ट्र दिल्लीच्या इशाऱ्यावर चालू देणार नाही, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं होतं. मात्र, आता ते स्वत: कोणाच्या इशाऱ्यावर दिल्लीला गेले?” असा सवाल रावसाहेब दानवेंनी केला आहे.

ते पुढे म्हणाले की, “आमच्या यूतीच्या काळात जागावाटपाचे निर्णय आणि निवडणूकीची रणनिती मातोश्रीवर ठरवली जायची. परंतू, आता मातोश्रीतून बाहेर निघून राहूल गांधी आणि मल्लिकार्जून खर्गेंच्या दारात जाऊन उभं राहण्याची पाळी जनतेने तुमच्यावर आणली आहे,” अशी टीका त्यांनी केली.