उद्धव ठाकरेंसोबत आम्ही जाऊ,असं वाटत नाही, आम्ही मनाने वेगळे झालोय, काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

मुंबई: उद्धव ठाकरेंपासून आम्ही मनाने दूर गेलो आहोत. ते आमचे मित्र आहेत का, हा प्रश्न आता त्यांनाच विचारावा लागेल. उद्धव ठाकरेंसोबत आम्ही जाऊ, असं वाटत नाही. आम्ही मनाने वेगळे झालोय, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेय. ते एबीपी माझाच्या ‘आयडिया ऑफ इंडिया’ कार्यक्रमात बोलत होते.

उद्धव ठाकरे मित्र होते..आज नाहीत का? असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले की, मित्र कोणाला म्हणतात? हा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारायला हवा.कारण मित्र तो असतो, जो एखादी गोष्ट जमत नाही, तर स्पष्ट सांगतो. त्यांनी फोन करुन बोलायला हवं होतं की, नाही जमत आहेत गोष्टी. पाच वर्ष मी मुख्यमंत्री होते. ते आमचे साथीदार होते. उद्धव ठाकरेंनी दरवाजा आणि रस्ता बंद केला होता. त्यानंतर आमचे कधी बोलणे झाले नाही. उद्धव ठाकरे मित्र होते. मला वाटतं नाही आम्ही आता उद्धव ठाकरेंसोबत जाऊ. आम्ही मनाने वेगळे झालोय, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “राजकीय मतभेद असते तर ठीक होतं, पण त्यांचे काही नेते आमचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी यांना शिवीगाळ करतात, त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही. आता आम्ही मनाने दूर झालो आहोत. दिवसातून दहा वेळा मोदींना शिव्या दिल्या नाहीत तर त्यांना जेवण पचत नाही. एक जण तर त्यांनी शिव्या द्यायलाच ठेवलाय. सकाळी नऊ वाजता त्यांचा भोंगा सुरु होतो, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला.