उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर; खरगे, राहुल-सोनिया गांधींची भेट घेणार

नवी दिल्ली : उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस श्रेष्ठींशी चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय जागावाटपाबाबतही या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

दिनांक ६, ७ आणि ८ ऑगस्ट हे तीन दिवस उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेसुद्धा दिल्लीला जाणार आहेत. यावेळी ते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राहूल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह अनेक जणांच्या भेटी घेणार आहेत. यावेळी इंडिया आघाडीच्या अनेक नेत्यांसोबत चर्चा होणार आहे, असे संजय राऊतांनी सांगितले.

दरम्यान, लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणूकाही महाविकास आघाडी एकत्र लढवणार आहे. शरद पवारांनी काँग्रेस आणि उबाठा गटाला प्रत्येकी १०० जागा लढवण्याचा प्रस्ताव दिल्याचीही माहिती पुढे आली आहे. उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यात जागावाटपाविषयी काही ठरणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.