उद्धव ठाकरे बांग्लादेशातील पीडित हिंदूंची करताय थट्टा; चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात

मुंबई : बांग्लादेशातील पीडित हिंदूंची उद्धव ठाकरे थट्टा करत आहेत. त्यांना या परिस्थितीतही विनोदबुद्धी सुचते आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. तसेच सल्लागार उद्धव ठाकरेंनी बांगलादेशाचा दौरा करावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. त्यांनी आपल्या ‘X’ अकाऊंटवर पोस्ट करत ठाकरेंवर निशाणा साधला.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “बांग्लादेशामधील सत्तापरिवर्तन आणि त्यानंतर हिंदू, बौद्ध आणि तिथल्या अल्पसंख्यांक समुदायाविरोधात सुरू असलेली हिंसा हा अत्यंत गंभीर विषय आहे. केंद्र सरकार यावर पहिल्या दिवसापासून गांभीर्याने व्यक्त होत आहे. पण अर्धवटराव ठाकरे यांना या परिस्थितीतही विनोदबुद्धी सुचते. मला त्यांच्या बुध्दीची कीव करावी वाटते आणि त्यांच्या देशभक्तीबद्दल प्रश्न निर्माण होतात.”

“बांग्देशातील भयंकर आणि भयानक स्थिती लक्षात न घेता अतिशय बालिश विधाने करून ते मोदींजींची नाही तर हिंसेचे बळी ठरलेल्या हिंदू, बौद्ध आणि इतर समाज बांधवांची थट्टा करत आहेत. ज्यांना या परिस्थितीतही राजकारण सुचते त्यांच्या बौद्धिक क्षमतेवरच प्रश्नचिन्ह लावावे लागेल. काँग्रेसच्या दारात लोटांगण घालून घालून उद्धव ठाकरेंचा बौद्धिक विकास खुंटला असावा. सत्तेसाठी लाचार होऊन त्यांनी याआधीच हिंदुत्वाला तिलांजली दिली आहे. आज ते पीडित हिंदूंची थट्टा करीत आहेत,” अशी टीका त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, “हिंदूविरोधी विचारांच्या, दहशतवादी कृत्य करणाऱ्या लोकांना सल्ला देण्यासाठी उद्धव ठाकरे हे अतिशय उत्कृष्ठ सल्लागार आहेत. हल्ली त्यांचा सल्ला हे सगळेच ऐकतात. म्हणून त्यांनी बांग्लादेशाचा दौरा करावा. फेसबुक लाईव्ह करावे. बांगलादेशात प्रबोधन करावे. हिंदूंवर अत्याचार होणार नाहीत. हिंदूंच्या हत्या, लूटमार, महिलांवर अनन्वित अत्याचार, मंदिरांवर हल्ले होणार नाहीत, यासाठी पुढाकार घ्यावा. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या शेहजाद्याला दिल्लीत जरूर लोटांगण घालावे, आंतरराष्ट्रीय प्रश्नावर आपले अघाध ज्ञान पाजळू नये,” असेही ते म्हणाले.