नागपूर : मध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरवात झाली आहे, आणि पहिल्याच दिवशी सहभागृहात वार पलटवार करण्यात येत आहेत. विधानपरिदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला.अंबादास दानवे म्हणाले की, “विधानसभेचे एक सभासद सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसले आहेत. यांच्याविषयी आम्ही एखाद्या गुन्हेगाराच्या मांडीला मांडी लावून बसत नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वारंवार केले आहे. त्यामुळे याविषयी सरकारची भुमिका काय आहे याची आम्हाला माहिती द्यावी.”
यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “प्रत्यक्ष व्यक्ती जेलमध्ये असतानासुद्धा आम्ही त्यांना मंत्रीपदावरून काढणार नाही, अशी भुमिका ज्यांच्या नेत्यांनी घेतली होती तेच आता असं बोलताहेत, याचं आश्चर्य वाटतं. आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलो नाही. मी आणि मुख्यमंत्री एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलो आहोत आणि आमच्या बाजूला अजितदादा बसले आहेत. त्यामुळे आमची काळजी करू नका. देशद्रोहाचा आरोपाखाली ते जेलमध्ये असताना तुम्ही त्यांना मंत्रीपदावरुन का काढलं नाही याचं उत्तर आधी आम्हाला द्या आणि त्यानंतर प्रश्न विचारा,” असेही ते म्हणाले.