उपोषणातून जागृती करायची होती, ती झालीय. आता आरक्षण मिळवायाच असेल तर..काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ?

मुंबई: “ओबीसीच्या ताटात मराठा समाजाला घेता येणार नाही. तसं झालं तर ते टिकणारं आरक्षण ठरणार नाही. त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाचं ताट आणि गरीब मराठा आरक्षणाचं ताट वेगळं असायला हवं.त्यामुळे मनोज जरांगेंनी जालन्यातून लोकसभा निवडणुक लढवावी,असा सल्ला बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी, दिला आहे. पत्रकार परिषदेत ते याबाबत बोलत होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “ओबीसीच्या ताटात मराठा समाजाला घेता येणार नाही. तसं झालं तर ते टिकणारं आरक्षण ठरणार नाही. त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाचं ताट आणि गरीब मराठा आरक्षणाचं ताट वेगळं असायला हवं. उपोषणातून जी जागृती करायची होती ती जागृती झाली. आता हा सरळ मिळवण्याचा भाग आहे. म्हणूनच जरांगे पाटलांनी लोकसभेच्या निवडणुकीत कुठल्याही पक्षाचा आधार न घेता स्वत:हून जालन्यामध्ये स्वतंत्रपणे लोकसभेची निवडणुक लढवावी.

कुठल्याही पक्षाकडून ते लढले तर पक्षाची बंधनं येतात. या बंधनांमुळे निवडून आल्यानंतर लोकसभेत गरीब मराठ्यांचा प्रश्न मांडता येणार नाही. त्यामुळे त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी जाहीर करावी, ते निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे.