नांदेड जिल्ह्यातील उबाठा गटाचे अनेक पदाधिकारी आणि सरपंचांनी गुरुवारी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. या पक्षप्रवेशामुळे नांदेड जिल्ह्यात उबाठा गटाला मोठे खिंडार पडले आहे.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड-कंधार आणि देगलूर-बिलोली येथील उबाठा गटाचे विविध पदाधिकारी आणि दोनशेहून अधिक गावांचे सरपंच, उप सरपंच आणि माजी सरपंच, माजी उपसरपंच यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये डॉ. अंकुश देवसरकर, मधुकर गिरगावकर, सुभाष काटे, शंकर पाटील, अजित पाटील, अशोक पाटील, काशिनाथ पाटील, आणि असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश होता.
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “गेल्या दोन वर्षात राज्यातील महायुती सरकारच्या कामाने प्रभावित होऊन अनेकजण शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत आहेत. सरकारच्या कार्यकाळात प्रत्येक निर्णय हा शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता भगिनी, युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक तसेच समाजातील प्रत्येक घटकातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी घेतला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिला भगिनींना भक्कमपणे स्वतःच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. तसेच युवकांना मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून दरमहा ६ हजार, ८ हजार आणि १० हजार रुपये देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न आमच्या सरकारने केलेला आहे,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “दुसरीकडे जालना आणि नांदेड हा भाग आपण समृद्धी महामार्गाला जोडणार असून त्यामुळे भविष्यात या भागातील शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होईल. हिंगोली येथे १०० कोटी खर्च करून हळद संशोधन केंद्र तयार करत असून त्याचा लाभ हळद उत्पादक शेतकऱ्यांना मिळू शकेल. त्यामुळे तुमच्या या भागाचा विकास सरकारच्या माध्यमातून नक्की होईल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.