मुंबई : ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर रवींद्र वायकरांचा जाहीर पक्षप्रवेश होणार आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून रवींद्र वायकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं. आतापर्यंत ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे असणारे वायकर एकाएकी शिवसेनेत प्रवेश करणार असल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. तसेच, रवींद्र वायकरांच्या रुपात उद्धव ठाकरेंना आतापर्यंतचा सर्वा मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील आणखी एक आमदार शिंदेंच्या गळाला लागल्याची चर्चा होती. रवींद्र वायकर यांनी एकनाथ शिंदे यांची गुप्तपणे भेट घेतल्याचीही चर्चा होती. यापूर्वी ईडीने आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात रवींद्र वायकर यांची चौकशी केली होती. गेल्या महिन्यात रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीने धाडही टाकली होती. त्यानंतर रवींद्र वायकर आता शिंदे गटात प्रवेश करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. रवींद्र वायकर यांच्यासोबत स्थानिक शिवसैनिकही शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे. वायकर यांनी सर्व नगरसेवक, शाखा प्रमुख, विभाग प्रमुखांना तयारीत राहण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे.