---Advertisement---
नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे आणि यशश्री शिंदे प्रकरणाने खळबळ उढाली असताना आता न्हावे गावातील एका तरुणीच्या डोक्यात लोखंडी रॉड घातल्याची धक्कादायक घटना घडलीय. तरुणाने एकतर्फी प्रेमातून हा जीवघेणा हल्ला केला असल्याची घटना समोर आलीय. हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आलीय.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, न्हावे गावातील प्रितम अरुण म्हात्रे याने एकतर्फी प्रेमातून २४ वर्षीय तरुणीच्या डोक्यात लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला आहे. सदर तरुणी गंभीरीत्या जखमी होऊन रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे.या गंभीर प्रकरणाने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तरुणीला २ वर्षांपूर्वी प्रीतम म्हात्रे याने प्रपोज केले होते. परंतु त्या तरुणीने त्यावेळी त्याला नकार दिला होता.
तरुणीने नकार दिल्याचा राग मनात ठेऊन न्हावे गावाजवळ माणिकटोक समुद्रकिनारी २६ जुलै रोजी तरुणी आपल्या मैत्रिणीसोबत गप्पा गोष्टी करत बसली होती. तेव्हा प्रीतम म्हात्रे हा तिथे पोचला. त्याने काही कळण्याच्या आताच लोखंडी सळईने तरुणीच्या डोक्यात व पाठीवर जोरदार हल्ला केला. त्यामुळे तरुणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तरुणीच्या डोक्याला १० टाके पडले असून ती अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपी प्रीतम म्हात्रेला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.