एआयवर बोलताना मोदींच्या बिल गेट्सशी मनमोकळ्या गप्पा, म्हणाले..

PM Modi-Bill Gates: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुंतवणूकदार आणि मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांच्याशी पंतप्रधानांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदीआणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्यातला संवाद नुकताच प्रकाशित झाला आहे. या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सपासून (AI) टेक्नॉलॉजी आरोग्य सेवा, हवामान बदल आणि ड्रोनच्या वापरामध्ये महिलांचा वाढता सहभाग यांसारख्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा केली. यावेळी, पंतप्रधानांनी एआय टेक्नॉलॉजीचा उल्लेख मराठी भाषेशी देखील अगदी रंजकपणे जोडला आहे.

या मुलाखती दरम्यान पंतप्रधान मोदी बिल गेट्स यांना एक गंमत सांगताना म्हणाले की, आमच्या देशात आईला आई (I) म्हणतात. लहान मूल जन्माला आल्यानंतर तो आय (I) सुद्धा म्हणतो आणि ए आई (AI) सुद्धा म्हणतो ही भाषेतली गंमत आहे.

पीएम मोदी म्हणाले की, इंडोनेशियातील G20 शिखर परिषदेदरम्यान जगभरातील प्रतिनिधींनी देशातील डिजिटल क्रांतीबद्दल जाणून घेण्यात रस दाखवला होता. मी त्यावेळी म्हणालो होतो की, आम्ही तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण केले, ते लोकांसाठी आहे त्यात कोणाची मक्तेदारी नाही. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी 2 लाख आरोग्य मंदिरे बांधली. आरोग्य क्षेत्र आणि रुग्णालये तंत्रज्ञानाशी जोडली. 3 कोटी लखपती दीदी तयार करण्याचे आमचे लक्ष्य आहे.

संभाषणादरम्यान पीएम मोदी म्हणाले की, प्रत्येक मुलाला, प्रत्येक गावात डिजिटल शिक्षण देणे हे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे. भारतात डिजिटल विभाजन होऊ देणार नाहीत, डिजिटल पायाभूत सुविधा खेड्यापाड्यात घेऊन जाणार. असा आमचा निर्धार आहे. बिल गेट्स यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान पीएम मोदींनी नमो ड्रोन दीदीचाही उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘जेव्हा मी जगात डिजिटल विभाजनाबद्दल ऐकायचो तेव्हा मला अनेकदा वाटायचे की मी माझ्या देशात हे होऊ देणार नाही. सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधा ही एक मोठी गरज आहे.’