नवी दिल्ली : भारतात तत्त्वज्ञानाचा सर्वोच्च स्तर आहे आणि संपूर्ण जग आपल्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी भारताकडे मोठ्या आशेने पाहत आहे. अशा स्थितीत आपण भारतीयांनी एकता आणि सद्भावनेसह राष्ट्रनिर्माणासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. जैन तीर्थंकर महावीरांच्या २५५० व्या निर्वाण वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सरसंघचालक म्हणाले की, जगातील विविध देशांमधील लोक आपल्या भौतिकतावादी, भोगवादी जीवनशैलीमुळे पीडित आहेत. त्यातून निर्माण होणाऱ्या असंख्य समस्यांना ते तोंड देत आहेत. अशा स्थितीत त्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी ते भारताकडे आशेने पाहत आहेत. कारण, त्यांना याची जाणीव झाली आहे की, त्यांच्या भौतिकवादी जीवनशैलीने शाश्वत आनंदाची प्राप्ती शक्य नाही. प्रत्येकाला आपल्या जीवनात त्याच शाश्वत आनंदाची अपेक्षा असते.भौतिकतावादी वस्तूंमध्ये कोणताही आनंद नाही. सर्वांसोबत सौहार्दपूर्ण राहावे, अहिंसेचे पालन करावे, धैयनि राहावे, चोरी करू नये अशा सर्व गोष्टींचे अनुसरण केले तर, जीवनात समाधानाची प्राप्ती होऊ शकेल.डॉ. भागवत म्हणाले, आपला समाज पूर्ण सत्याच्या शोधासाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करतो.
मार्ग वेगवेगळे असू शकतात. मात्र, लक्ष्य एकच आहे. आपल्या समाजात अनेक त-हेचे लोक आहेत, जसे जैन, शीख इत्यादी. या देशाचे नागरिक असल्याने आपण सर्व एक आहोत आणि एकोप्याने राहूनच आपल्याला राष्ट्रनिर्माण करायचे आहे. आपण सर्व एक राहू तर जास्त शक्तिशाली आणि प्रभावशाली बनू.भारत आणि जगातील इतर देशांच्या लोकांनी पूर्ण सत्य आणि शाश्वत सुख, आनंदाच्या शोधार्थ वेगवेगळे मार्ग अवलंबिले. मात्र, भारताचा शोध आणि उर्वरित जगातील शोध यात फरक हा होता की, ते या सत्याचा शोध बाह्य जगात घेत राहिले आणि तिथेच थांबले. आपण बाह्य जगातील शोधानंतर स्वतःमध्येच हा शोध सुरू केला आणि तिथेच आपल्याला सत्य गवसले.मुळात, जो शक्तिशाली असतो तो लढण्याचा पुरस्कार करतच नाही. तो दुसयांना समजावणे, सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा विचार करतो. तो सर्वांनाच आपले मानून अशक्तांनाही मजबूत बनवत असतो, असेही सरसंघचालक म्हणाले.