प्रा. डॉ. अरुणा धाडे
(भाग दुसरा)
दुबई येथील ‘हिंदू मंदिरा’च्या प्रवेशद्वारावरील गडद लाल केशरी फुलांचे आकर्षक तोरण पांढर्या शुभ्र पृष्ठभूमीवर फार उठून दिसत होते. मंद मंद हवा छोट्या-छोट्या फुलांचे झोपाळे झुलवून जात होती. घंटांचे किणकिणणे कानी पडत होते. प्रवेशद्वाराच्या सुशोभिकरणावरून मंदिराच्या आतील भागाची कल्पना येऊ लागली होती.
मंदिराच्या मुख्य सभामंडपात प्रवेश करण्यापूर्वी एक कॉरीडॉर लागतो. त्यातून जाताना वेगवेगळ्या आकाराच्या 108 घंटा आपलं लक्ष वेधून घेतात. ह्या घंटा जणू स्वागतासाठी सज्ज असलेल्या स्वागतिकाच! घंटांची कल्पकता बघण्यात हरखून जातो तोच समोर दिसतो मंदिराचा विस्तृत सभा मंडप! मंडपाच्या तीन चतुर्थांश गोलाकार भागातील 16 देवीदेवतांची मंदिरं म्हणजे जणू इंद्र दरबारी भरलेली देवतांची नयनरम्य देवसभाच!
पहिलं मंदिर अर्थातच गणपतीचं! गणेशाचे सुबक साचेबद्ध मंदिर आणि मंदिरातील गणपती बाप्पाचे प्रसन्न सुंदर रूप बघताक्षणी आपलं चित्त वेधून घेतं. पुढे देखण्या लक्ष्मीनारायणाचे मंदिर आहे. लक्ष्मीनारायणाच्या अंगावरील महावस्त्र तलम रेशमी वाटावे इतके कौशल्याने घडविले आहे. श्रीहरीला प्रिय असलेल्या तुळशीला तिथे आवर्जून स्थान दिलं गेलं आहे. राम दरबारातील प्रभू श्रीराम, लक्ष्मण, जानकी, हनुमान यांच्या रूपाचे काय वर्णन करावे. समोर साक्षात उभे असावेत इतका तो जिवंतपणा! इतके ते तेजस्वी रूप! राधाकृष्णाचे आरासपानी सौंदर्य, त्यांचे लखलखते मुकुट, कर्णआभूषण, गळ्यातील हार, बाजूबंद, कमरबंध, रेशमी वस्त्र सगळं डोळे दिपवणारं होतं. मधूनच मंदिरात प्रवेश करते झालेले भक्त, जय सिया राम, जयजय श्रीरामचा जयघोष करीत होती.
सभागृहाच्या मध्यभागी शिवपार्वतीचे सुंदर मंदिर त्यासमोर मोठीशी पांढरी शिवपिंड आणि शिवपिंडीच्या समोर ऐटीत बसलेला काळ्या चकचकीत पाषाणातील डौलदार नंदी फार छान दिसत होता. शिवलोकात हरवलो तोच हर हर महादेवाचा आवाज कानी पडला. पुढे शक्ती स्वरूपा मॉं दुर्गाचे मंदिर आहे. एका हातात गदा घेतलेल्या हनुमानाचे मंदिरं आहे. त्याच्या पुढे गुरू दत्तात्रेयांचं मंदिर आहे. सगळ्या मूर्तींच्या गळ्यात नुकत्याच घातलेल्या टपोर्या ताज्या गुलाबी गुलाबाचे हार शोभून दिसत होते.
हिंदू धर्माने जगण्यातील प्रत्येक गोष्टीचे वैविध्य सहज स्वीकारले आहे. श्रद्धेच्या बाबतीतही लोकमान्यतेनुसार इष्ट देवतेपासून ग्रामदेवतेला वेगवेगळ्या रूपात, वेगवेगळ्या अवतारात, स्थानिक परंपरेनुसार, प्रतीक स्वरूपात सहज स्वीकारले आहे. या व्यापकतेचा विचार करून वेगवेगळ्या श्रद्धेच्या अनुयायांना हे मंदिरं आपलं ‘आस्थास्थान’ वाटावे म्हणून शक्य तितक्या देवतांना इथे समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
संपूर्ण आखाती प्रदेशात दक्षिण भारतीय मोठ्या संख्येने वास्तव्याला आहेत हे आपण जाणून आहोत. त्यांचे प्रमुख दैवत भगवान श्रीअय्यंपन आणि श्रीगुरुवायूरचे मंदिरं इथे आहे. तसेच मुकाम्बिक देवी, व्यंकटेश्र्वर बालाजी, आपल्या दोन्ही पत्नी, वल्ली आणि देवसेनासह भगवान मुरुगनचेसुद्धा मंदिरं आहे.
गुरू गोविंद दोऊ खड़े काके लागू पाय असे ईश्र्वराच्या समकक्ष गुरूला स्थान असणार्या परंपरेत गुरूंचे मंदिर गुरूंच्या भक्तांसाठी नसून कसे चालेल? श्री स्वामी समर्थ, श्री साईबाबा, जलाराम बाबा, झुलेलाल बाबा यांचीही मंदिरं आहेत. शीखपंथीयांसाठी ग्रंथसाहिब गुरुद्वारा आहे.
एक मजेदार विरोधाभास इथे जाणवला की, दक्षिण भारतीय देवतांच्या मूर्ती कृष्ण रंगाच्या पाषाणातील होत्या. ज्या तामिळनाडूतील कन्याकुमारी आणि मदुराई येथे घडविलेल्या होत्या, तर उत्तर भारतीय देवतांच्या मूर्ती ह्या शुभ्रधवल रंगांच्या राजस्थानातील जयपूरच्या होत्या. असे वेगवेगळे निर्माण स्थान असले तरी देखणेपण कुठेही कमी नव्हतं.
मंदिराच्या छतावरचे विशाल भूमितीय ‘अष्टदल कमळ’ आणि त्यामागून येणारा प्रकाश अप्रतिम होता. सततच्या उष्ण आणि प्रखर सूर्यप्रकाशाला रोखण्यासाठी पारंपरिक अरेबिक ‘मश्रबिया’ बांधकाम पद्धतीचा वापर करून त्याचे रूपांतर परावर्तित मंद झिरपणार्या सूर्यप्रकाशात करून सौम्य शांत वातावरण निर्मिती केली होती.
सभामंडपात मध्य भागात बसण्याची विस्तृत व्यवस्था आहे. काही भक्त स्तोत्र पठण करीत होती. काही जपमाळ करीत होती. लहान मुले आनंदाने इकडे तिकडे धावत होती. आपल्या मुला-सुनांसोबत आलेले वृद्ध आई-वडील भारावलेले दिसत होते. मंदिरांच्या शुभ्र भिंतींवर रामेश्र्वर धाम, द्वारकाधाम, बद्रीनाथधाम आणि जगन्नाथधामचे अतिशय चित्तवेधक ऑइल पेंटिंग्ज होते जे मंदिराच्या भक्तिमय सौंदर्यात मौलिक भर घालत होते.
मंदिरातून बाहेर पडताना हे मंदिर कित्येक शतके इथेच असावे, असे का कुणास ठाऊक वाटून गेले.