जळगाव । नेपाळमध्ये बसला झालेल्या अपघातात जळगाव जिल्ह्यातील २७ पेक्षा जास्त भाविकांचा मृत्यू झाला असून या अपघातात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या बालपणीच्या मित्राचे देखील निधन झालं आहे. बालपणीचा मित्र गमावल्याने त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
नेपाळमधील बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या २७ जणांचे मृतदेह विशेष विमानाने शनिवारी रात्री जळगाव येथे आणण्यात आले. विमानतळावरून मृतदेहांसाठी २७ स्वतंत्र अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, विमानतळावरून रुग्णवाहिकेतून मृतदेह वरणगाव येथे नेण्यात आले. या सर्व मयत व्यक्तींवर शनिवारी रात्रीच अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, या अपघातातील गंभीर जखमी असलेल्या आणखी तिघांचा मृत्यू झाला. यात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या बालपणीच्या मित्राचा देखील निधन झालं आहे. यासंदर्भातील माहिती खडसे यांनी माध्यमांना दिली. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून सर्वांना श्रद्धांजली अर्पण करतो असं म्हणत खडसे भावूक झाले. बालपणीचा मित्र गमावल्याने त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. सुधाकर जावळे हा माझा कार्यकर्ता नव्हता तो माझा सवंगडी होता असं म्हणत एकनाथ खडसे भावुक झाले.