जळगाव : जिल्हा दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी हॉटेल क्रेझी होम येथे सकाळी घेण्यात येत आहे.सभेच्या पार्श्वभूमीवर बोलताना आमदार एकनाथ खडसे म्हणाले, की जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी मंदकिनी खडसे असताना हा संघ गेली सात वर्षे सातत्याने नफ्यात होता.
मात्र, यंदा हा संघ तब्बल सहा कोटी ७२ लाख रुपयांच्या तोट्यात आहे. खडसे म्हणाले, की वार्षिक अहवालात कोणतीही तरतूद नसताना दोन कोटींचा भाव फरक द्यावा लागला आहे. सहकारी नियमानुसार १२ रुपयांप्रमाणे वाढ करावी लागली; परंतु खासगी विक्री सहा रुपयांप्रमाणे झाली.त्यामुळे दुप्पट फरक द्यावा लागला आहे. तसेच, दूध भुकटी खरेदीत दोन कोटी रुपयांची अफरातफर तत्कालीन अधिकारी अंबीकर व केंदार यांनी केली. विद्यमान संचालकांनी अद्याप त्यांची चौकशीच केलेली नाही. त्यामुळे दोन कोटींची ही रक्कम वार्षिक अहवालात आलेली आहे. घसारा हा कॅश लॉस नसतो; परंतु ती किंमतही घसाऱ्यात दाखविण्यात आली आहे.दूध भुकटी वेळेत विक्री न केल्याने नुकसान झाले.
कामगारांचे वेतनासाठी प्रत्यक्षात पाच कोटी रुपयांची तरतूद सन २०२२-२३ च्या अहवालात करण्यात आली आहे. मात्र, चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात ती तब्बल दुप्पट दहा कोटी करण्यात आली.त्यामुळे खर्चाचे नियोजन करण्यात आल्याचे दिसून आले नाही, तसेच दूध खरेदी करताना बल्क कूलर सेंटरला २० टक्के वाढ दिली आहे.त्यामुळे तब्बल ४० लाख रुपये खर्च वाढला. माजी सुरक्षारक्षक एन. जे. पाटील हे दोषी आढळले. त्यांना संघाच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले. त्यांनी संघाची बदनामी केली. त्यामुळे संघाला आर्थिक तोषीस सहन करावी लागली. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असा ठराव करण्यात आला;
परंतु त्यांना १२ लाख रुपये अदा करण्यात आले, तसेच त्यांनी संघावर असलेल्या केसेस अद्यापही मागे घेतलेल्या नाहीत.संघाने अन्यायकारक निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट करून खडसे पुढ़बोलताना म्हणाले, की दर दिवशी ३०० लिटर दूध पुरविणाऱ्या संस्थाच आता निवडणुकीस पात्र ठरणार आहेत. मुक्ताईनगर तालुक्यात रोज ३०० लिटर दूध पुरविणारी एकही संस्था नाही. त्यामुळे ते पात्र ठरणार नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर हा अन्यायच असेल.