एकापाठोपाठ एक चार वेळा तो ‘ऑनलाईन गेम’ हरला… आणि तरुणाने केले असे काही

ओडिशा : ओडिशातील जरपार भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणाने स्वतःच्या गळ्यावर ब्लेडने वार केले. यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे . सौम्या रंजन नाईक (२४, रा. जेरेंग जरपड) असे तरुणाचे नाव आहे. त्याच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार तो कोणतेही काम करत नसून नेहमी मोबाईलवर गेम खेळत असे. शुक्रवारीही तो एक गेम खेळत होता आणि एकापाठोपाठ एक चार वेळा तो हरला. याचा राग येऊन त्याने सेव्हिंग ब्लेड घेऊन त्याच्या गळ्यावर वार करण्यास सुरुवात केली.

त्याला हे करताना पाहून त्याच्या घरच्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि तो गंभीर जखमी झाला होता. त्याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्याला आयसीयूमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि या प्रकरणाचा तपास केला असता तरुणाला ऑनलाइन गेमचे व्यसन असून सततच्या पराभवामुळे हे पाऊल उचलल्याचे सांगितले.

यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत
हा प्रकार येथे प्रथमच घडलेला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. यामध्ये अनेकांचा मृत्यूही झाला आहे. पोलिसांच्या मते, ऑनलाइन गेमच्या व्यसनामुळे लोक अनेकदा जीवघेणे पाऊल उचलतात. अशाच घटनांमुळे अलीकडेच भारतात PUBG सह 70 हून अधिक ऑनलाइन गेम्सवर बंदी घालण्यात आली होती.