एटीएममध्ये कॅश भरताना 65 लाखांचा अपहार प्रकरणी चौकडी जाळ्यात; 19 लाखांचा मुद्देमाल जप्त

चाळीसगाव ः चाळीसगाव शहर पोलिसांनी एटीएममध्ये कॅश भरताना तब्बल 65 लाखांचा अपहार करणाऱ्या कस्टोडियन, ऑडीटरसह चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. प्रवीण देविदास गुरव (38, पाटणादेवी रोड, आदित्यनगर चाळीसगाव), दीपक भिकन पवार (34, पाटणदेवी रोड, आदित्यनगर चाळीसगाव), चंद्रशेखर एकनाथ गुरव (43, गुजराल पेट्रोलपंपाजवळ, निवृत्ती नगर, जळगाव) व राजेंद्र वाल्मीक चौधरी (58, नारायणवाडी, चाळीसगाव) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.

गोरक्षनाथ पोपट डोंगरे (38, शिवशंकर सोसायटी, रुम नं. 16 पाथरवट लेन, परेन आईसक्रिमच्या मागे, पंचवटी नाशिक) यांनी चाळीसगाव शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार प्रवीण देविदास गुरव, दीपक भिकन पवार (दोन्ही रा. पाटणादेवी रोड, आदित्यनगर चाळीसगाव) व ऑडीटर चंद्रशेखर एकनाथ गुरव (गुजराल पेट्रोलपंप जवळ, निवृत्तीनगर, जळगाव) यांनी संगनमताने चाळीसगाव शहरातील आयसीआयसीआय बँकेचे एक एटीएम व आयडीएफसी बँकेचे एक एटीएम असे दोन तसेच पाचोरा शहरामध्ये मनिस्पॉट एक एटीएम व आयसीआयसीआय बँकेचे एक एटीएम अशा एकूण चार एटीएम मशीनमध्ये कंपनीमार्फत बँकेने कंपनीचे नोकर असल्याने विश्वासाने रोख रक्कम टाकताना त्यात दरवेळी पूर्ण रक्कम न भरता त्यातून वेळोवेळी थोडी थोडी अशी एकूण 64 लाख 82 हजार 200 रुपये बाजूला काढून विश्वासघात केला. माहे मे 2023 ते डिसेंबर 2023 दरम्यान हा प्रकार घडला. ऑडीटर चंद्रशेखर एकनाथ गुरव यांची दोघांवर नियंत्रण ठेवण्याची जवाबदारी होती मात्र सिक्युर हॅल्यु इंडीया लिमीटेड या खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य केले. दरम्यान, या गुन्ह्यात चाळीसगावातील राजेंद्र वाल्मीक चौधरी (58, नारायणवाडी, चाळीसगाव) या संशयिताने अपहारातील 14 लाखांची रोकड स्वीकारल्याने त्यासही अटक करण्यात आली.

ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, सहा.पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलिस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, हवालदार  राहुल सोनवणे, हवालदार योगेश बेलदार, महेंद्र पाटील, दीपक पाटील, उज्वलकुमार म्हस्के, ज्ञानेश्वर पाटोळे, विनोद खैरणार, आशुतोष सोनवणे,  अमोल भोसले व सबा शेख यांनी केली.