नरेंद्र मोदी हे रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या सोबत १८ मंत्रीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील.एनडीएतील सर्वच घटक पक्षांना मंत्रिमंडळात संधी लाभणार आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाला सर्वाधिक मंत्रीपदे मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, यासोबत महाराष्ट्रातील खासदारांना महत्वाच्या खात्यांचे मंत्रिपद मिळू शकते. यात भाजपकडून नितीन गडकरी, पीयूष गोयल, नारायण राणे आणि रक्षा खडसे यांची नावे चर्चेत आहेत. खान्देशातून तिसऱ्यांदा खासदार झालेल्या रक्षा खडसे यांना मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आता संपूर्ण राज्याचे रक्षा खडसे यांची मंत्रीपदीवर्णी लागेल का याकडे डोळे लागले आहे.
रक्षा खडसे या 2010 पासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी कोथळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्या जिल्हा परिषद सदस्य झाल्या. शिक्षण सभापती असताना त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवून आपल्या कार्याचा ठसा उमटवला. सन २०१४ मध्ये रावेर लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षातर्फे त्यांनी निवडणूक लढविली व त्या खासदार झाल्या, त्यानंतर सन २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली, त्या दुसऱ्यांदा याच मतदार संघातून खासदार झाल्या. रक्षा खडसे या दोन टर्म भाजपच्या खासदार आहेत. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्या रावेर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. त्या आता तिसऱ्यांदा रावेर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या असून त्यांना मंत्रिपदाची संधी आहे.
नितीश कुमार,चंद्राबाबू नायडू यांच्या खालोखाल शिंदे गटाचे सर्वाधिक खासदार आहेत. शिंदे गटाला दोन मंत्रीपदे दिली जाणार आहेत. एक कॅबिनेट आणि दुसरं राज्यमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून मंत्रीपदासाठी श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, प्रतापराव जाधव आणि धैर्यशील माने यांची नावे चर्चेत आहेत. श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा खासदार झाले आहेत. शिंदे गटातील ते सर्वात सीनिअर खासदार असल्याने त्यांना मंत्रीपद दिलं जाऊ शकते. अजितदादा गटालाही एक मंत्रीपद दिलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. या मंत्रिपदासाठी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचं नाव चर्चेत आहे. एक मंत्रीपद आणि दोन नेते अशी चुरस अजितदादा गटात आहे. त्यामुळे अजितदादा काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कॅबिनेट मंत्रीपद मिळालं तर पटेल मंत्री होतील, तर राज्यमंत्रीपद मिळालं तर तटकरे मंत्री होतील, असंही सांगितलं जात आहे.
आठवलेंची कॅबिनेटपदी होणार बढती?
रामदास आठवले यांच्या पक्षाने महायुतीत महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. एकही सीट न घेता आठवले यांनी देशभर भाजपचा प्रचार केला होता. त्यामुळे आठवलेंनाही मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी आठवले यांना कॅबिनेटपदी बढती देण्याबाबतचं आश्वासन निवडणुकीत दिलं होतं. त्यामुळे यावेळी आठवलेंचं प्रमोशन होणार असल्याचं सांगितलं जात आहे. चार महिन्यावर विधानसभा निवडणुका आल्याने आठवलेंना ही जबाबदारी दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.