एरंडोल तालुक्यात २५ बियाणे दुकानांची तपासणी

एरंडोल : तालुक्यातील कासोदा येथे ६, एरंडोलला १४, रिंगणगावात ३. खर्ची-रवंजे येथे २ अशा एकूण २५ बियाणे दुकानांची कृषी विभागाकडून तपासणी करण्यात आली, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी डी. पी. गंभीरे व एरंडोल पंचायत समितीचे कृषी अधिकारी बी. एस. मोरे यांनी दिली.

तपासणी मोहिमेत ज्या त्रुटी आढळून आल्या, त्यांची पूर्तता करणेबाबत बियाणे विक्रेत्यांना नोटिसा देण्यात आल्या. १३ जून अखेर तालुक्यात बी. टी. कापूस बियाणे व इतर बियाणे पुरेशा प्रम ाणात उपलब्ध आहेत. बियाण्यांची तालुक्यात टंचाई नाही, असा दावा कृषी विभागाने केला आहे. एरंडोल तालुक्यासाठी ११,३८० मेट्रिक टनाचा साठा मंजूर आहे. ८,५०० मेट्रिक टनाचा साठा आजच्या घटकेला शिल्लक असून त्यापैकी ३,६८० मेट्रिक टन युरिया हे खत विक्रेत्यांकडे शिल्लक आहे. तसेच रासायनिक खतांचा पुरेसा साठा शिल्लक असून कोणतीही टंचाई नाही. रासायनिक खतांसोबत इतर कोणत्याही प्रकारचे लिंकिंग करण्यात येऊ नये याबाबत तालुक्यातील खत विक्रेत्यांना सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत. लिंकिंगबाबत तक्रार आल्यास व त्यात सत्यता आढळून आल्यास वेळ प्रसंगी खत विक्रेत्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा कृषी विभागातर्फे देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी पक्क्या बिलांसह बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशकांची खरेदी करावी. कोणताही विक्रेता रासायनिक खतांची व बियाण्याची जादा दराने व लिंकिंगने विक्री करणार नाही. काळाबाजार करणार नाही याबाबत विक्रेत्यांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. तालुक्यातील प्रत्येक कृषी केंद्रावर कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तालुका स्तरावर भरारी पथक स्थापन करण्यात आले असून त्यात तालुका कृषी अधिकारी डी. पी. गंभीरे, एरंडोल पंचायत समिती कृषी अधिकारी बी. एस. मोरे, मंडळ कृषी अधिकारी कासोदा एन. आर. टोळकर, मंडळ कृषी अधिकारी एरंडोल के. एस. साळुंखे, वजन मापे निरीक्षक कुमार सिंग राजपूत यांचा समावेश आहे. दरम्यान या भरारी पथकाने शेतकऱ्यांची तक्रार येण्याची वाट न पाहता प्रत्यक्ष अॅक्शन मोडमध्ये यावे व वस्तुस्थिती जाणून घ्यावी. त्याप्रमाणे कारवाईचा बडगा दाखवावा, अशी जाणकारांची अपेक्षा आहे.