एरंडोल: येथील साईनगरमधील रहिवासी असलेल्या युवकाने घराबाहेरील पोर्चमध्ये लोखंडी अँगलला दोराने बांधून गळफास घेतल्याची घटना १९ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मृत युवक हा सिव्हील इंजिनीअरिंगचा डिप्लोमाधारक असून, अविवाहित होता व एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे.
येथील समाधान देवरे हे साईनगरमधील रहिवासी असून ते आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात चतुर्थ कर्मचारी म्हणून सेवेत आहे. त्यांचा मुलगा अक्षय समाधान देवरे (वय २२ वर्षे) याच्यासह परिवार घेऊन वाक, ता. भडगाव येथे जवळच्या नातेवाईकच्या मेहेंदीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम पार पडल्यानंतर देवरे व त्यांचा मावसभाऊ हे दोघे दुचाकीने एरंडोलला परत जात होते.
अक्षय हा मंडपाच्या गाडीमध्ये एरंडोलला परतत होता. तो यांच्या आधी एरंडोल येथे पोहचला. दरम्यान, सम ाधान देवरे व त्यांचा मावसभाऊ घरी पोहचल्यावर अक्षय याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याचे त्यांना आढळले. त्याला खाली उतरविण्यात येवून एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुनील लोहार, अनिल पाटील, मिलिंद कुमावत हे पुढील तपास करीत आहे.