एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन लागू करा – इंटकचे मुकेश तिगोटे यांची मागणी

जळगाव : एसटी कर्मचाऱ्यांना चार वर्षानी दिलेली वेतनवाढ अन्यायकारक आहे. शासकीय कर्मचा-यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन वाढ लागू करण्यात यावे. यामागणीची पुर्तता न झाल्यास तिव्र आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉग्रेस (इंटक) संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी बुधवार २८ रोजी पत्रकारांशी संवाद साधताना कॉग्रेस भवनात दिला.

एसटी कामगारांच्या थकबाकी रक्कमा तसेच वेतन वाढ यासंदर्भात निर्णय घेण्याच्यासाठी मार्च महिन्यात सुरुवातीच्या दोन आठवड्यात इंटक पदाधिकारी सर्व आमदार-खासदार, मंत्र्यांना भेटून मागणी निवेदन देवून याविषयी चर्चा करणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयात इंटकतर्फे याचिका दाखल करणार आहोत.

राज्यात ८५ हजार एसटी कामगार असून ६८ हजार चालक वाहक आहेत, अशी माहिती देत तिगोटे म्हणाले की, राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे देण्याची तरतूद आहे. परंतु शासनाने वेळोवेळी जाहीर केल्याप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर लागू न केल्यामुळे संचित थकबाकी सुमारे ९४७ कोटी रुपये झाली आहे. त्यामुळे महागाई भत्ता ४६ टक्के देवून विविध संचित थकबाकीच्या रक्कमा तात्काळ एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात यावी, अशी मागणी केली.

एसटी कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. माहे जुलै २०१८ पासून माहे डिसेंबर २०२३ पर्यंत एकूण ६४ महिन्याचा महागाई भत्त्याची थकबाकी प्रलंबित आहे. तसेच शासकीय कर्मचारी व एसटी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्याच्या टक्क्यातील ८४ टक्के फरक देणे बाकी असल्याची माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी उमवि समन्वयक प्रदेश कॉग्रेसच्या प्रतिभा शिंदे, शाम तायडे, विनोद कोळपकर, राजीव पाटील, विभागीय इंटक अध्यक्ष भगतसिंग पाटील, अविनाश भालेराव, श्रीधर चौधरी, नरेंद्रसिंग राजपूत, संदीपी सुर्यवंशी, प्रदीप देशमुख, अल्ताफखान आदी काँग्रेस तसेच इंटकचे पदाधिकारी उपस्थित होते.