ऐन उन्हाळ्यात जळगाव जिल्ह्यात पावसाचा अंदाज ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगाव । राज्यात कुठे ऊन, कुठे पाऊस अशी स्थिती पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसात जळगावमध्ये उन्हाचा तडाखा वाढला आहे. तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसवर गेला आहे. एप्रिल सुरु होताच उकाडा वाढला आहे. यामुळे जळगावकर हैराण झाला आहे. मात्र जळगावकरांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

कारण हवामान खात्याने जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. जळगाव जिल्ह्यात ५ ते ८ एप्रिलदरम्यान वादळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून (आयएमडी) वर्तविण्यात आला आहे. यामुळे जळगावकरांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे.

 जिल्ह्यात ५ एप्रिल पासून तब्बल चार दिवस पावसाची स्थिती राहणार आहे. केवळ पाऊसच नाही, तर ढगांच्या गडगडागट व विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. ८ एप्रिलपर्यंत ही स्थिती राहील, त्यानंतर मात्र पुन्हा उन्हाचा तडाखा वाढणार आहे

दरम्यान, जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज आहे. रब्बी हंगामातील पिकांची काढणी जवळपास ९० टक्के झाली आहे. येत्या दोन दिवसांत उर्वरित गव्हाचीही काढणी पूर्ण होईल. त्यामुळे अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना फारसा फटका बसणार नाही. मात्र, वादळी वाऱ्यांची शक्यता असल्याने केळीला फटका बसू शकतो.