जळगाव । जळगाव जिल्ह्यासह राज्यात परतीचा पाऊस परतला आणि दुसरीकडे ऑक्टोबर हिटचा तळाखा सुरु झाला. उन्हाचा चटका वाढल्याने नागरिक चांगलेच घामाघूम होऊ लागले आहे. मात्र अशातच आता राज्यात थंडीची चाहूल लागू लागली आहे.
हिमालयाच्या कुशीत असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये सुरु झालेल्या बर्फवृष्टीमुळे महाराष्ट्रात उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय झाले झाल्यामुळे गेल्या तीन दिवसात जळगाव जिल्ह्यात गुलाबी थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाली. सोमवारी जळगाव शहरातील किमान तापमान राज्यात सर्वात कमी खाली आले होते.
ऑक्टोबर हिट आणि उन्हाचा चांगला चटका जाणवणाऱ्या जळगावकरांना दिलासा मिळाला आहे. राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद जळगावात झाली आहे. जळगाव शहरात १५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. जळगावपेक्षा महाबळेश्वरचे तापमान जास्त होते. महाबळेश्वरमध्ये १७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यामुळे महाबळेश्वरपेक्षा जळगाव थंड, असे एका दिवसासाठी म्हणावे लागेल.