ऑनलाईन पेन्शनप्रणालींचा जि.प.च्या सेवानिवृत्त शिक्षकांना मिळणार दिलासा

जळगाव : जिल्हा परिषदेच्या शाळेतील सेवानिवृत्त शिक्षकांना पेन्शनसाठी वारंवार मिनीमंत्रालयात वाऱ्या कराव्या लागत असत. त्यातच जि.प.तून निधी वर्ग केल्यानंतर त्यांचे पेन्शन जमा होण्यासाठी 10 ते 12 दिवसांचा कालावधी लागत होता. मात्र जि.प.सीईओ श्रीअंकित यांनी पेंशन ऑनलाईन जमा करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत सूचित केले आहे. त्यामुळे आता या प्रणालीमुळे जि.प.शिक्षकांच्या खात्यावर एका क्लिकवर ही रक्कम वर्ग करण्यात येणार असल्याने या शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी श्रीअंकित यांनी सेवानिवृत्त शिक्षकांचे पेन्शन उशिराने जमा करणाऱ्या बीडीओंना नोटिसा बजावल्या आहेत. जिल्ह्यातील 12 तालुक्याचे पेन्शन वेळेत झाले तर उर्वरीत तीन तालुके रावेर, यावल, भुसावळ या याठिकाणी पेंशन उशिराने काम झाले याबाबत  खुलासा बीडीओंकडून मागितला आहे. सीईओंनी याची दखल घेतल्याने पुढील महिन्यात सेवानिवृत्त शिक्षकांचे पेन्शन वेळेवर होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मिनीमंत्रालयात विकास कामांना  दिवाळीनंतर येणार वेग 

मिनीमंत्रालयात दिवाळीनंतर विकास कामांना वेग येणार आहे. जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितींकडून निधी दिला जातो. यावर्षी जिल्हा परिषदेला 179 कोटींचा निधी प्रास्तावित करण्यात आला आहे. त्यात मागील दायित्व वजा करून नियोजन करावे लागत आहे. निधी खर्च होऊन त्यामाध्यमातून कामे व्हावीत यासाठी कामजाला गती देण्यात येत आहे. साधारत: महिन्याभरात प्रशासकीय मान्यता व निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कामांचा श्रीगणेशा होईल, असे सांगितले जात आहे. मात्र दिवाळीनंतर अवघ्या चार महिन्याचा कालावधी हा निधी खर्च करण्यासाठी जि.प.ला मिळणार आहे. कारण मार्च महिन्यात सदर निधी खर्च करण्याची अंतिम मुदत असणार आहे. त्यामुळे चार महिन्यात कामांचा निधी खर्च कण्याचे मोठे आव्हान जि.प.प्रशासकांकडे असणार आहे.

डेंग्यू नियंत्रणासाठी आरोग्य विभागाच्या उपाययोजनांवर भर  

जिल्हाभरात डेंग्यूच्या साथीने डोके वर काढले आहे.  ग्रामीण भागातही डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने सर्वेक्षणावर आरोग्य विभागाकडून भर दिला जात आहे. जि.प.चे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना डेंग्यूबाबत युध्दपातळीवर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. डेंग्यूच्या अनुषगांने जिल्ह्यात 20 अतिजोखीमीची ठिकाणे जाहिर करण्यात आली आहे. त्यापार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून 100 टक्के रुग्णांची लक्षणानुसार डेंग्यू तपासणी व सर्वेक्षण केले जात आहे. डेंग्यू नियंत्रणासाठी  जि.प.च्या आरोग्य विभागाकडून सध्या अलर्ट मोडवर कामकाज सुरू आहे.  डेंग्ंयू रुग्णांचे प्रमाण सध्या महापालिका क्षेत्रात वाढत असल्याचे सध्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात त्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्ण संख्या कमी आहे.

जिल्ह्यात लम्पी नियंत्रणात… 

जिल्ह्यात लम्पी नियंत्रणात आणण्यात जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग व राज्याचे पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रयत्नाचे हे फलित म्हणावे लागेल. लम्पी नियंत्रणात आल्याने जिल्हाभरातील गुरांचे बाजार खुले करण्यात आले आहे. मात्र जळगाव जिल्ह्यात लसीकरणामुळे गुरांवरील लम्पी नियंत्रणात आला असला तरी जिल्ह्यांच्या शेजारी जिल्हा धुळे याठिकाणी गुरांवरील लम्पी नियंत्रणात आलेला नाही. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात या ठिकाणाहून गुरांचे विक्रीसाठी स्थलांतर बाजाराच्या माध्यमातून संसर्ग वाढण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याने गुरांचे मृत्यूचे प्रमाण कमी राहिले. त्यामुळे पशुपालकांना हा मोठा दिलासा मिळाला आहे.