मुंबई: मराठा आरक्षणासंबंधात अधिसूचना निघाल्यामुळे मंत्री छगन भुजबळ हे सरकारवर नाराज आहेत. ओबीसींमध्ये घबराट निर्माण झाली आहे. आमचं आरक्षण संपलं अशी भावना ओबीसी समाजामध्ये आहे. ही भावना चुकीची आहे असं मला वाटत नाही. मागच्या दरवाज्याने सर्व मराठ्यांना ओबीसीमध्ये घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. नव्या आयोगात त्यांच्या मर्जीचे लोकं भरले आहेत. सर्व सरकारी कर्मचारी कामाला लावले आहेत,असं ते माध्यमांशी बोलतांना म्हणाले.
सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की, मराठा समाज कोणत्याच दृष्टीने मागास नाही. पण, आता हे खोटं ठरवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. दुसरीकडे मराठ्यांना ओबीसीमध्ये घेतलं जातं आहे. एकतर्फी कारवाई होताना दिसत आहे,सरकारकडून हट्ट पुरवण्याचं काम सुरु आहे. ओबीसी समाज देखील मतदान करतो हे सरकारने विसरु नये, असही ते म्हणाले.
तुम्ही वेगळे आरक्षण दिलं असतं तर आम्ही काही म्हटलं नसतं. कोर्टाकडून घेतलं असतं तरी काही म्हटलं नसतं. पण, सध्या जे सरकारचं सुरु आहे ते चुकीचं आहे. ५४ लाख नोंदी सापडल्या. शिंदे समितीचे काम संपलयंय, तर तिचं काम का सुरु ठेवावं. किती खर्च करत राहायचं ? लोकांची मागणी असते त्याला प्रतिसाद द्यावा लागतो. पण, कोणावर अन्याय करणार नाही म्हणता. पण, जर ५४ लाख आणि त्यांचे सगेसोयरे ओबीसीत आल्यास धक्का लागणार नाही का? ढकलून बाहेर काढण्याचं हे काम आहे. ओबीसी समाजाला सरकारकडून स्पष्टता हवी आहे, असं भुजबळ म्हणाले.