जळगाव : काम करीत असताना विजेचा शॉक लागून राहुल दरबार राठोड (22) ह.मु. गजानन पार्क, कुसुंबा याचा मृत्यू तर त्याचा सहकारी जीवन दयाराम चौधरी (22) बेटावद (ता.जामनेर) हा तरुण गंभीररित्या जखमी झाला. सोमवार 16 रोजी सकाळी सकाळी 8.30 वाजता शहरात एमआयडीसीतील एका प्लॉस्टीक कंपनीत ही घटना घडली. या कंपनीत कामाला जाण्याचा राहुल राठोड याचा आज पहिलाच दिवस होता. काळाने मात्र त्याच्यावर जीवनाचा हा शेवटचा दिवस उगविला.
दरबार भिका राठोड हे मुळ शेळगाव (बऱ्हाणपूर म.प्र.) येथील रहिवासी असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी गेल्या दोन दशकापासून जळगाव येथे स्थायीक झाले.अपघातात त्यांच्या पायाला गंभीर इजा झाल्याने कुटुंबाची धुरा त्यांचा मोठा मुलगा राहुल याने घेतली. वेल्डींग,हातमजुरी अशी कामे करुन तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. एमआयडीसीत एका प्लॉस्टीक कंपनीत त्याला काम मिळाले. त्यानुसार तो सकाळी 8 वाजता कंपनीच्या कामावर रुजू झाला.
या कंपनीत पूर्वीपासून कामाला असलेला जीवन चौधरी याच्यासोबत राहूल याने कामाला सुरुवात केली असता विजेचा शॉक लागून राहूल तसेच जीवन हे दोघे गंभीररित्या जखमी झाले. दोघांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. तपासणीअंती वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी राहुल राठोड याला मृत घोषित केले. तर अतिदक्षता विभागात जखमी जीवन चौधरी याच्यावर उपचार सुरु झाले. त्यानंतर अधिकच्या उपचारासाठी जीवन चौधरी याला खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.
राठोड कुंटुंबातील सदस्यांनी रुग्णालयात धाव घेतली. राहुल याच्या निधनाची वार्ता कळाल्यानंतर त्याचे आई वडिल, लहान भाऊ तसेच नातेवाईकांनी आक्रोश केला.राहुल याच्या पश्चात वडिल दरबार राठोड, आई कौसल, विवाहित बहिण अस्मिता तसेच लहान भाऊ अर्जुन असा परिवार आहे. एमआयडीसी पोलिसांनी कंपनीत तसेच रुग्णालयात धाव घेत घटनाक्रम जाणून घेतला.