परदेशात राहून आमच्या देशातील निष्पाप मुस्लिमांची… ; अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांचे झाकीर नाईकला प्रत्युत्तर

नवी दिल्ली  : ‘वक्फ’ दुरुस्ती विधेयकाबाबत परदेशातून भारतीय मुस्लिमांना भडकावण्याचा आणि त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या झाकीर नाईक यांना केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी प्रत्युत्तर दिले.

भारतातून पळून जाऊन परदेशात राहणाऱ्या कट्टरतावादी नाईक याने त्याच्या पोस्टमध्ये प्रस्तावित कायदा धोकादायक असल्याचा आरोप केला होता. या कायद्याविरोधात मुस्लिमांनी त्यांची असहमती संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीसी) पोहोचवण्याचे आवाहन केले होते. नाईकने त्यासाठी क्यूआर कोड आणि ऑनलाइन याचिकेची लिंक सार्वजनिक करून १३ सप्टेंबरपर्यंत किमान ५० लाख भारतीय मुस्लिमांना त्यांची नापसंती जेपीसीकडे पाठवण्याचे आवाहन केले होते.

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी झाकीर नाईकचा अपप्रचार खोडून काढला आहे. ते म्हणाले की, “परदेशात राहून आमच्या देशातील निष्पाप मुस्लिमांची दिशाभूल करू नका. भारत हा लोकशाही देश आहे आणि लोकांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे. खोट्या प्रचारामुळे चुकीच्या संकल्पना प्रस्थापित होतील,” असेही रिजिजू यांनी म्हटले आहे.