जळगाव : पहूर (ता.जामनेर) येथील वाघुर नदीवर असलेल्या पुलाचे कठडे नसल्याने पुन्हा एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पूलावरून पडण्याची ही दुसरी घटना असून, संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मध्य प्रदेशातील राजू पावरा हा मजूर पिंपळगाव कमानी येथे शेतात कामाला होता. तो काही कामानिमित्त पहूर येथे आला असता शनिवार, २७ रोजी रात्री ८ ते ९ वाजेच्या दरम्यान वाघुर नदीच्या कठडे नसलेल्या भिंतीवरून खाली कोसळला. त्यामुळे रस्त्याच्या खाली वीस ते तीस फूट खोल भाग आहे. याचा अंदाजच न आल्यामुळे त्याचा तोल जाऊन तो खाली कोसळताच त्याने जोरात किंकाळी ठोकली. आवाज ऐकताच आजूबाजूच्या दुकानदारांनी धाव घेतली. त्यांनी तत्काळ १०८ शी संपर्क साधला. ग्रामीण रुग्णालय पहुर येथील १०८ रुग्णवाहिकेचे पायलट अमजद खान व डॉ . लियाकत यांनी तरूणास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.राहुलच्या डोक्याला उंचीवरून पडल्यामुळे जबर दुखापत झाली होती. त्याच्यावर प्रथमोपचार करून जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पहुर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल रवी देशमुख यांच्या सह सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर पांढरे , उपसरपंच राजू जाधव यांनी रुग्णाच्या नातेवाईकांशी संपर्क केला. नातेवाईकांशी संपर्क झाल्याने पुढील उपचारासाठी जळगावला नेणे सोईचे झाले. दरम्यान दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना राजू पावरा याची प्राणज्योत मालवली.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जालना यांच्या अंतर्गत सदर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. पहूर पेठ गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याने सर्वीस रोड तयार करून मिळावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. गावात जायला रस्ताच नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. पुलाच्या या जीव घेण्या भिंतीला लवकरात लवकर कठडे बसवावे. संबंधित अभियंता ग्रामपंचायतीने तात्काळ कळवावे. अशी मागणी होत आहे. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी एका हात गाडीवर पोट भरणाऱ्या मजुराचा मृत्यू झाला होता. तसेच वाघुर नदीच्या पुलावरून कोसळल्याने राष्ट्रीय महामागचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्याच कामावरील एका मजुराला गंभीर दुखापत झाली होती.