कत्तलीसाठी जाणारे 13 उंट पोलिसांनी पकडले; दोन अटकेत,एक फरार

सावदा :  कत्तलीसाठी निर्दयीपणे कोंबून अवैधरित्या 13 उंट घेऊन जाणारी आयशर ट्रक सावदा पोलिसांनी पकडली. शेकडो कि.मी.चा प्रवास करून थेट राजस्थान, मध्यप्रदेश व महाराष्ट्र असे दोन आरटीओ बॉर्डरवरून प्राणी उंट वाहतूकीचा कोणताच परवाना नसलेली ही ट्रक इथपर्यंत आली तरी संबंधित अधिकाऱ्यांची लक्षात ही बाब न येणे यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारी नाही का? असा प्रश्न निर्माण होत आहे. याकडे जिल्हा आरटीओ अधीक्षक व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी लक्ष देणे अपेक्षित आहे.

सावदा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील लुमखेडा, शिवार हतनूर धरणाचे पुलाजवळ भारतीय वंशाचे दोन लाख 85 हजार रुपये किंमतीचे एकूण 13 उंट निर्दयीपणे कोंबून त्यांचे पाय व तोंड दोरीने बांधून उंट वाहतुकीचा कुठलाही परवाना नसताना बेकायदेशीररित्या कत्तलीसाठी घेऊन जाणारी दहा लाख रुपये किंमतीची आयशर ट्रक क्र..सी.जी.12 बी.एच. 3281 यास रात्री सावदा पोलिसांनी पकडली. सदर ट्रकमधील दोन आरोपी सावदा पोलिसांनी ताब्यात घेतले.  एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला.या घटनेचा पुढील तपास एपीआय जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अन्वर तडवी व पोलीस नाईक मोहसीन पठाण हे करीत आहे.

आरोपींविरुध्द गुन्हा दाखल 

याबाबत पो.कॉ. विनोद भिमराव दामोदर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मकबूल खान फकृद्दीन खान वय 45, रा. वरखेडा तह.आष्टा जि. सिहोर, अरबाज खान शकील खान वय 21 रा. अमरपुरा तहसील जिल्हा देवास, मध्यप्रदेश या दोघे आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली असून (3) खालिद खान खलील खान रा. नोशेराबाद देवास मध्य प्रदेश हे आरोपी फरार झालेला आहे. या आरोपींविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 कलम 11(1) आणि महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1960 चे कलम 6,9,11, व मोटर वाहन कायदा 1989 चे कलम 83 प्रमाणे सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.