कधी शुद्धीत येणार?

राहुल गांधी नुकतेच म्हणाले की, “राममंदिर सोहळ्यामध्ये फक्त श्रीमंतानाच बोलावले होते. गरीब-मजूर कुणीच नव्हते. सामान्य लोकही नव्हते. तिथे फक्त अमिताभ बच्चनसारख्या लोकांनाच निमंत्रण होते.” काय म्हणावे? पण, मग राममंदिराच्या गर्भगृहात ज्यांनी प्रत्यक्ष रामललाची प्राणप्रतिष्ठा पूजा केली, ती १५ दाम्पत्यं कोण होती? करोडपती होती की राहुल गांधींसारखे पिढ्यान्पिढ्या सत्ताधीश असणार्‍या कुटुंंबकबिल्याचे प्रमुख होते?

म्हणतात ना, ‘चोराच्या मनात चांदणे.’ तसेच राहुल गांधींना सगळीकडे श्रीमंत आणि प्रसिद्ध लोकच दिसतात. त्यांना तिथे मानसन्मानाने बोलावली गेलेली सामान्य कुटुंबातली भौतिक अर्थाने सामान्य, पण लौकिक अर्थाने असामान्य असलेले ते हजारो लोक दिसलेच नाहीत. त्यांना हे दिसले नाही की, देशातले नामांकित उद्योगपती, कलाकार, राजकीय नेते आणि देशातली उर्वरित जनता सगळे जण त्या दिवशी समान स्तरावर होते. हो, या सोहळ्याला त्यांनाही आमंत्रण होतेच. पण, इतक्या पवित्र आणि ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार न होण्याचे करंटेपण एकेकाच्या नशिबात स्वमस्तीने असेल, तर कोण काय करेल म्हणा? राम मंदिर सोहळ्यामध्ये संबंधित न्यासाकडून हजारो लोकांना आमंत्रित केले गेले.

त्यामध्ये अयोध्येत राम मंदिर निर्माण व्हावे, यासाठी प्रचंड त्याग करणार्‍या लोकांनाही बोलावले होते. ते सगळे कोट्यधीश तर सोडाच, कदाचित त्यांच्या खिशात एक रुपयाही नसेल. पण, रामनाम घेत या लोकांनी राम मंदिराच्या बांधणीसाठी आयुष्य पणाला लावले होते. देशातील सर्व जाती-धर्माच्या संत-महात्म्यांनाही बोलावले होते. या देशाची संस्कृती सृजनांचा सन्मान करणारी आहे. त्यामुळे साहित्यिक, लेखक, कलाकार यांनाही बोलावले होते. ‘बालीश बहू बायकांत बडबडला’ असे म्हटले जाते. पण, बालीश लोक बायकांमध्येच बडबडतात, हे साफ चूक आहे बरं आणि महिलासुद्धा बालकाच्या प्रति वाटणार्‍या करूणेमुळे, प्रेमामुळे बालकाची बालीश अर्थहिन बडबड ऐकत असतात. पण, राहुल गांधी जे ना मनाने बालीश आहेत ना वयाने, पण तरीही अखंड तर्कहिन अथांग बडबड सुरू असते. ‘मनोरजंन में कोई कमी नही होनी चाहिए’! ब्रीद घेऊन बेरकीपणाने राहुल गांधी वागत असतात. त्यांचे वास्तविकतेचे भान हरवले गेले आहे का? असे असेल, तर ते कधी शुद्धीत येणार, ते देवच जाणो!

भविष्यात भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षही काँग्रेसमधून आलेलाच असेल – मी म्हणालो. मी कोण, अहो मी ‘बेस्ट सीएम’ नव्हतो का? काँग्रेसचे नेते भाजपमध्ये जायला लागलेत. काही तरी वाटते का त्यांना? इथे आमच्या पक्षाला भगदाड पडले. उठसूठ मावळे-कावळे होऊन उडतात. जाऊ दे, आम्हाला सवय पडली आहे. पण, काँग्रेसचे नेते भाजपमध्ये कसे जाऊ शकतात? भाजपवाल्यांना शोभते का हे? काय म्हणता, भाजपचे ‘इनकमिंग’ सुरू आहे आणि आमचे ‘आऊटगोईंग’ सुरू आहे, म्हणून मी द्वेषापायी हे सगळं म्हणतोय? काय म्हणता, आम्ही भाजपला तत्वज्ञान शिकवतो आणि राज्यसभेवर मात्र पूर्वाश्रमीच्या काँग्रेसच्याच प्रियंका चतुर्वेदीलाकसे पाठवतो? मग आमचे शास्त्र आहे ते. आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचा तो भाजपवाला!

हा हा हा…. काय विनोद केला मी? ‘कोविडोलॉजिस्ट’ हा शब्द आठवला. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. कोणे एकेकाळचा राजा मी. पण आज असं फिरावं लागतंय. काय म्हणता,सगळीकडे जाण्याची, सगळ्यांना भेटण्याची बुद्धी कशी सुचली? कशी सुचली म्हणजे आम्ही आहोतच हुशार. आता लोकांना भेटलो नाही, तर निवडणुकीचा निकाल काय लागेल तो लागेल. पण, सर्वांत आधी आम्हाला सत्ता हवी, या इच्छेचा निकाल लागेल. आता नाही, तर कधीच नाही. काय म्हणता आता नाही, तर कधीच नाही, हे म्हणायला उशीर झाला? भाजपमध्ये घराणेशाही नाही.

त्यामुळे भाजपचा कार्यकर्ता राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतो. काय म्हणता? आमच्या इथे ‘हम दो हैं और साथ राऊत, अंधारे, माने और सरोदे हैं.’ भविष्यात या सगळ्यांना आमच्या राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व्हावेसे वाटले तर? आमच्या पक्षाचे अध्यक्ष असे कुणीही होणार नाही. जिथे सख्खा चुलत भाऊ पक्षाचा अध्यक्ष बनू शकला नाही, तिथे हे शक्यच नाही. आमच्या पक्षाचे आम्ही आणि आमच्या नंतर आमचे वारसदारच मालक! काय म्हणता, तुम्ही राष्ट्रीय पक्षाबद्दल बोलता आणि राष्ट्रीय पक्ष आणि एका राज्यातल्या काही शहरांचा पक्ष यात अंतर असते? म्हणजे आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत की राज्यातल्या काही जिल्ह्यांतला पक्ष आहोत? यावर अभ्यास करून लवकरच फेसबुक लाईव्ह येतो. मग देतो उत्तर, समजलं?