कमला हॅरिस यांच्या डेमोक्रॅटिक अधिवेशनात निनादले वैदिक मंत्रांसह ‘ओम शांती शांती’चे स्वर

अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीबाबत राजकारण शिगेला पोहोचले असताना डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन सध्या चर्चेचा विषय बनले आहे. शिकागो येथे झालेल्या तीन दिवसीय डेमोक्रॅटिक राष्ट्रीय अधिवेशनाचा तिसरा दिवस खास होता, कारण त्याची सुरुवात राकेश भट्ट या हिंदू पुजाऱ्याने वैदिक मंत्रांनी केली. संपूर्ण सभागृहात वैदिक मंत्रांसह ‘ओम शांती शांती’चे स्वर निनादले.

मेरीलँडच्या शिव विष्णू मंदिरातील पुजारी राकेश भट्ट यांनी येथील जनतेला देशासाठी संघटित होण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, “आपल्यात मतभेद असू शकतात, परंतु जेव्हा राष्ट्राचा प्रश्न येतो तेव्हा आपण संघटित होणे आवश्यक आहे. हे सर्व समाजाच्या भल्यासाठी व्हायला हवे. हीच गोष्ट आपल्या सर्वांना न्यायाच्या दिशेने नेण्यास मदत करेल.”

मूळ बेंगळुरूचे असलेले राकेश भट्ट यांनी ऋग्वेद आणि तंत्रसार (माधव) आगमाचे प्रशिक्षण त्यांच्या गुरू, उडुपी अष्ट मठातील पेजावर स्वामीजी यांच्याकडे घेतले. राकेश भट्ट हिंदी, इंग्रजी, संस्कृत, तामिळ, तेलगू आणि कन्नड भाषा बोलतात. त्याच्याकडे संस्कृत, इंग्रजी आणि कन्नड या तीन भाषांमध्ये बॅचलर आणि मास्टर डिग्री आहे. त्यांनी बेंगळुरूच्या ओस्टीन कॉलेजमधून इंग्रजी व कन्नडमध्ये पदवी आणि जयचामाराजेंद्र कॉलेजमधून संस्कृतमध्ये पदवी मिळवली.

डेमोक्रॅटिक पक्षाचे उपराष्ट्रीय वित्त अध्यक्ष अजय भुटोरिया यावेळी म्हणाले की, राकेश भट्ट यांची डेमोक्रॅटिक राष्ट्रीय अधिवेशनात हिंदू प्रार्थना होणे हा एक महत्त्वाचा क्षण आहे. जो डेमोक्रॅटिक पक्षाची सर्वसमावेशकता आणि विविधतेची वचनबद्धता दर्शवितो. भारतीय अमेरिकन समुदायाच्या समृद्ध सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरांचा अशा प्रमुख व्यासपीठावर सन्मान होताना पाहणे उत्साहवर्धक आहे. हा क्षण अमेरिकन समाजात आपल्या समुदायाचा वाढता प्रभाव आणि मान्यता प्रतिबिंबित करतो.