कर्करोगावरील उपचारात वापरणार भारतीय मसाले

नवी दिल्ली :  कर्करोगावरील उपचारासाठी भारतीय मसाल्यांचे पेटंट आयआयटी मद्रासमधील संशोधकांनी घेतले आहे आणि यावरील औषधे २०२८ पर्यंत बाजारात उपलब्ध होतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. फुफ्फुस, स्तन, आतडे, पाठीचा कणा, तोंडाचा कर्करोग तसेच थायरॉईड पेशींच्या विरोधात लढणारी सूक्ष्म औषधे भारतीय मसाल्यांमध्ये आढळली आहेत. ही सूक्ष्म औषधे सामान्य पेशींसाठी सुरक्षित असतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सामान्य पेशींसाठी सूक्ष्म औषधे सुरक्षित असल्याचे आढळले आहे. सध्याच्या कर्करोगाच्या औषधांमधील प्रमुख आव्हाने असलेल्या सुरक्षा आणि किमतीच्या समस्येवर संशोधक सध्या काम करीत आहेत. अलिकडेच प्राण्यांवर झालेल्या प्रयोगांचे यशस्वी निष्कर्ष काढण्यात आले आहेत आणि २०२७-२८ पर्यंत औषधे बाजारात उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवून वैद्यकीय चाचण्यांचे नियोजन केले जात आहे.

भारतीय मसाल्यांच्या तेलांचे वैद्यकीय फायदे
आपल्याला कित्येक युगांपासून माहीत असले, तरी त्यांच्या जैवउपलब्धतेमुळे त्यांचा वापर मर्यादित झाला. मात्र, या मयदिवर मसाल्यांचे सूक्ष्म औषधांचे मिश्रण अत्यंत प्रभावीपणे काम करते. यात सूक्ष्म औषधांच्या मिश्रणाचे स्थैर्य हा महत्त्वाचा विचार होता आणि तो आमच्या प्रयोगशाळेत अनुकूल करण्यात आला, असे आयआयटी मद्रासमधील रसायन अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक आर. नागराजन यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. सक्रिय घटक आणि कर्करोगाच्या पेशींशी त्यांच्या परस्परसंवादाच्या पद्धती ओळखण्यासाठी यांत्रिक अभ्यास महत्त्वाचा आहे आणि आमच्या प्रयोगशाळेत तो समांतरपणे चालू आहे. प्राण्यांवर वैद्यकीय चाचण्या सकारात्मक झाल्या आहेत. दोन ते तीन वर्षांच्या कालावधीत औषध बाजारात आणण्याचा विचार करीत आहोत, असे त्यांनी सांगितले