जळगाव : कर्ज फेडण्यासाठी पैसे देत नसल्याने नातवाने ८० वर्षीय आजीचा खून करुन तिचा मृतदेह गोणपाटमध्ये भरुन ठेवल्याची धक्कादायक घटना पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर या गावात बुधवार, १५ रोजी उघडकीस आली होती. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या ४ तासात गुन्ह्याचा तपास करून नातवाला अटक केली आहे.
पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांना वृद्धेला कोणीतरी अज्ञात इसमाने तिचे घरात तिला जिवे ठार मारुन गोणपाटमध्ये बांधून ठेवले असल्याची गोपनीय माहिती बुधवार, १५ मे रोजी मिळाली होती. त्यांनी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास घटनास्थळी जावून पुढील तपास करण्याचे आदेश दिले होते. यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील, सफौ विजयसिंग पाटील, पोह लक्ष्मण पाटील, विजय पाटील, महेश महाजन, अकरम शेख, महेश सोमवंशी हे सर्व फत्तेपुर ता.जामनेर येथून तेथील खुनाचा तपास करीत असताना पिंपळगाव हरेश्वर येथे पोहचले. गावात गोपनीय माहिती काढली असता मयत मांजाबाई हिचे बहिणीचा नातू विशाल भोई याने हे हत्येचे कृत्य केले असल्याची खबर पथकाला मिळाली. पथकाने विशाल भोई याची माहिती घेतली असता तो पाचोरा येथे मयताचे प्रेतासोबत ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथे गेला असल्याचे समजले. त्यावरून पथकासह पिंपळगाव हरेश्वर येथून पोह रणजीत पाटील, जितेंद्र पाटील, दिपक आहिरे नेम. पिंपळगाव हरेश्वर पो.स्टे. असे सर्व पाचोरा येथे आले. विशाल याला ताब्यात घेतले. विशाल प्रभाकर भाई, (वय २२, रा. पिंपळगाव हरेश्वर ता.पाचोरा) असे त्याने नाव सांगीतले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विशाल भोई याची चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. त्याने सांगीतले की, माझ्यावर कर्ज झाले असल्याने कर्ज फेड करणेकरीता मी आजीकडून पैश्यांची मागणी केली होती. त्यावर आजीने मला नकार दिल्याने मी आजी मंजाबाई हिचा गळा दाबुन तिला जिवेठार मारले. त्यानंतर तिचे हातातील चांदीचे गोटपाटल्यापैकी १ गोटपाटली व कानातील सोन्याच्या बाळया काढून घरात असलेल्या गोणपाटमध्ये भरुन तिथे घरात ठेवले. मी मागच्या दरवाज्याने बाहेर निघुन मोटार सायकलने अजिंठा ता. अजिंठा जि.संभाजीनगर येथे जावून तिथे एका सोनार दुकानावर मोडून तिथून पैसे घेवून परत पिंपळगाव हरेश्वर येथे घरी आलो होतो, अशी गुन्ह्याची कबुली दिली आहे. संशयीत आरोपी विशाल प्रभाकर भाई यास गुन्ह्याचे पुढील तपासकामी पिंपळगाव हरेश्वर पो.स्टे.चे ताब्यात देण्यात आले आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरूळे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे.