काही महिन्यांपूर्वी डोळेझाक करणाऱ्या मालदीवने चक्क भारताचे आभार मानले आहेत. भारताप्रति कृतज्ञता व्यक्त करताना राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी देशाच्या नाजूक अर्थव्यवस्था मजबूत करण्यात मदत केल्याबद्दल चीनसह भारताचे आभार मानले आहेत. चीनचे समर्थक मानले जाणारे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइझू यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात संबोधित करताना सांगितले की, चीन आणि भारत देशाचे कर्ज फेडण्यासाठी सर्वाधिक मदत करतात.
याशिवाय एका स्थानिक माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “मालदीवच्या वतीने मी चीन सरकार आणि भारत सरकारचे अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी, आर्थिक सार्वभौमत्व सुनिश्चित करण्यासाठी आणि लोकांच्या हितासाठी सहकार्य केल्याबद्दल आभार मानतो.” विशेष म्हणजे मोहम्मद मुइज्जू गेल्या वर्षी मालदीवमध्ये भारतविरोधी अजेंडा ‘इंडिया आउट’ मोहिमेच्या मदतीने सत्तेवर आले होते. त्यानंतर मुइज्जू सरकारमधील काही मंत्र्यानी पीएम मोदींवर आक्षेपार्ह टीका केली होती.
मागील प्रकारानंतर मालदीववर अचानक बहिष्काराचा ट्रेंड आला आणि त्याचा परिणाम मालदीवमध्ये दिसल्याने पर्यटक कमी झाले. त्यानंतर मुइझ्झू यांना भारताशी शत्रुत्व पत्कारण्याचे दुष्परिणाम समजले आणि त्यांनी दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी काम सुरू केले. अलीकडेच नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी आयोजित केलेल्या शपथविधी सोहळ्यात मुइझूही सहभागी झाले होते. याशिवाय मालदीवने आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी भारताने दिलेले डॉर्नियर विमान आणि हेलिकॉप्टरचा वापर पुन्हा सुरू केला आहे.