कर्नाटकात पाण्याची तीव्र टंचाई; पाण्यासंदर्भात सरकारकडून नवे नियम

Bengaluru: बेंगळुरू आणि त्याच्या जवळपासच्या शहरांमध्ये सध्या तीव्र पाणीटंचाई सुरु आहे. या शहराला 3500 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. केवळ 219 टँकरची नोंदणी झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. या टँकरची नोंदणी 7 मार्चपूर्वी करावी, असा सल्लाही राज्य सरकारने जारी केला होता. याशिवाय कर्नाटक सरकारनेही या टँकर मालकांना पाण्याच्या टँकरची किंमत ठरवून देण्याचा इशारा दिला आहे. तसेच पाण्याचे टँकर मालकांनी खरेदीदाराकडून जास्तीचे पैसे घेऊ नयेत असंही सांगण्यता आलं आहे.

याचबरोबर पाण्याची तीव्र टंचाई लक्षात घेऊन कर्नाटक सरकारच्या नव्या नियमांनुसार स्वच्छ पाण्याने कार धुतल्यास पाच हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. स्वच्छ पाण्याने गाड्या धुण्यास कर्नाटक पाणीपुरवठा आणि सीवर बोर्डने बंदी घातली आहे. याशिवाय बागकाम, दुरुस्तीचे काम, वॉटर फाऊंटन, रस्ते बांधणी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामात शुद्ध पाण्याच्या वापरावर देखील बंदी घालण्यात आली आहे.

बेंगळुरू शहर प्राधिकरणाने पाण्याच्या टँकरची किंमत जाहीर केली आहे. शहरातील पाच किलोमीटरच्या परिघात 6000 लिटरच्या पाण्याच्या टँकरची किंमत 600 रुपये आहे. तर 8000 लिटर पाण्याच्या टँकरची किंमत 700 रुपये आणि 12000 लिटर पाण्याच्या टँकरची किंमत 1000 रुपये ठेवण्यात आली आहे.